‘सोमेश्वर’मधील अपहार ५४ लाखांचा
सोमेश्वरनगर, ता. ३ : येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या टाइम ऑफीसद्वारे झालेल्या अपहाराची द्विस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून, यामध्ये ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कामगार अधिकारी दीपक निंबाळकर आणि रूपचंद साळुंखे हे दोघेजण दोषी आढळले, तर अन्य तिघे अपहाराबाबत निर्दोष आढळले आहेत. त्यांच्यावर वसुली व रीतसर कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय गुरुवारी (ता. ३) संचालक मंडळाने घेतला.
गैरहजर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नावापुढे बोगस हजेरी दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफीसद्वारे घडला होता. याबाबत टाइम ऑफीसचे पाचही कामगार व कंत्राटदारास निलंबित केले होते. सुमोटो पद्धतीने चौकशीसाठी समित्या नेमल्या. कायदेशीर बाबी तपासणे आणि जबाबदारांचा शोध घेण्याबाबतची चौकशी कामगार विधिज्ञ अॅड. मिलिंद पवार समितीने केली. साखर आयुक्तालयाच्या पॅनेलवरील मेहता- शहा चार्टर्ड अकौटंट कंपनीने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील आर्थिक कारभाराची चौकशी केली.
याबाबत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, ‘‘आठ वर्षांच्या रेकॉर्डची व्याप्ती जास्त असल्याने समितीस ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. तीनशे रोजंदारी कामगारांच्या हजेरी व बिलांची व्यक्तिनिहाय, दिवसनिहाय सखोल चौकशी झाली. टाइम ऑफीस, खातेप्रमुख, अकाउंट विभाग अशा तिन्हीकडील रेकॉर्डची तपासणी झाली. खोटी हजेरी नोंदवून बिले करणारा साळुंखे हा अपहारास जबाबदार असल्याचे आणि कामगार अधिकारी निंबाळकर यांनी कर्तव्यात कुचराई केल्याने या दोघांवर आरोपपत्र दाखल केले. सहकार कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाईसाठी व वसुलीसाठी अॅड. मंगेश चव्हाण यांच्या समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.’’
हेड टाईमकीपर विलास निकम, क्लार्क दीपक भोसले, शिपाई बनकर या तिघांचा अपहारामध्ये कसलाही संबंध नसल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे चौकशी कालावधीत निलंबित केलेल्या या तिघांना संचालक मंडळात विषय घेऊन रुजू करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. दरम्यान, कंत्राटदार शशिकांत जगताप यांचाही रकमेच्या अपहारात समावेश नसल्याचे आढळून आले.
वाढता वाढता अपहार वाढे
सन २०१७-१८ मध्ये १८ हजार, २०१८-१९ मध्ये ६४ हजार, २०१९-२० मध्ये ५९ हजार, २०२०-२१ मध्ये २ लाख १९ हजार, २०२१-२२ मध्ये सव्वातीन लाख, २०२२-२३ मध्ये साडेनऊ लाख, २०२३-२४ मध्ये साडेतेरा लाख, तर २०२४-२५ मध्ये २४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

