‘पॅट’चा पेपर पुन्हा फुटला

‘पॅट’चा पेपर पुन्हा फुटला
Published on

सोमेश्वरनगर, ता. ११ : शिक्षण विभागाने लादलेल्या ‘पॅट’ परीक्षेतील मराठी विषयाचा पहिलाच पेपर फुटल्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ‘एससीईआरटी’ने घेतला, मात्र यानंतरही पेपरफुटीचे ग्रहण सुटले नाही. उलट त्यापुढील इंग्रजीचा आणि शुक्रवारी (ता. ११) गणिताचाही पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच ‘पॅट’ने परीक्षेच्या वेळापत्रकाचा खेळखंडोबा केलेला असताना सर्व पेपर फुटल्याने कष्टाळू विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत.
शाळांना आपल्या परीक्षा घेण्याचा अधिकार असतानाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) स्वतंत्रपणे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून मराठी, इंग्रजी व गणित या तीन विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी (पॅट) घेण्याचा निर्णय घेतला. शाळांच्या सत्र आणि वार्षिक परीक्षेसोबत ‘पॅट’चे पेपर घ्यायचे आणि ऑनलाईन गुण भरत बसायचे, असा उद्योग शाळांच्या मागे लागला आहे. विद्यालयांना स्वतःच्या नियमानुसार सहा विषयांचे नऊ पेपर तर घ्यावेच लागतात, शिवाय त्यातल्याच तीन विषयांचे पुन्हा पॅटच्या नावाखाली पेपर घ्यावे लागतात. तीन पेपर दुबार का द्यायचेय? या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला कुणाकडेही उत्तर नाही.
असा गोंधळ असतानाच ‘पॅट’चा पहिलाच आठवी व नववीचा मराठीचा पेपर फुटला. त्याबाबत ‘एससीईआरटी’ने पंचवीस युट्यूब चॅनेल्सवर कायदेशीर कारवाई करत असल्याचा दिखावाही केला. मात्र, पेपर फुटल्याने झालेल्या ‘मास कॉपी’बाबत उपाय काढला नाही. अशातच बुधवारी (ता. ९) नववीसाठी झालेला इंग्रजीचा पेपरही आदल्या दिवशी सायंकाळी युट्यूबवर उपलब्ध झाला. तर, शुक्रवारी (ता. ११) गणिताचा पेपर-१ झाला. तो आदल्या दिवशी युट्यूबला उपलब्ध झाला. या प्रकाराने ‘एससीईआरटी’ला युट्यूबर, क्लासचालक जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे वर्षभर अभ्यास करून पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा युट्यूबर विद्यार्थी सरस ठरणार आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर यांनी, गोपनियता रहात नसताना शासकीय पातळीवरून पॅटचा आग्रह का होत आहे? गोपनियतेशिवाय मूल्यांकन पारदर्शक कसे होणार? असा प्रश्न उपस्थित केला.
शिक्षण अभ्यासक महेंद्र गुणपुले म्हणाले, ‘‘शाळासुद्धा पेपर शाळेत आल्यावरच पाकीट फोडतात. असा गोपनियतेचा कुठलाही नियम ‘एससीईआरटी’ने पाळला नाही. त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसते. परिपत्रकामध्ये काही वर्गाचे दुबार पेपर घ्या- काहींचे घेऊ नका, असे सांगितले आहे. शाळेची नियमित परीक्षा मूल्यमापनासाठी आवश्यक आहे, तर पॅटचे गुण ऑनलाईन भरायचे असल्याने ती घ्यावी लागते. मात्र, आतापर्यंत ऑनलाईन भरलेल्या गुणांचे काय झाले, हे कुणी सांगत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com