वाणेवाडीकरांच्या आठवणीतली ‘ज्योती’

वाणेवाडीकरांच्या आठवणीतली ‘ज्योती’

Published on

सोमेश्‍वरनगर, ता. ११ : ‘‘हातात हात घ्यायला काय घाबरायचे? मी स्री असूनही घाबरत नाही अन् तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून लाजत आहात. अभिनयात जिवंतपणा आला पाहिजे, घाबरायचे नाही. धीटपणे काम करायचे. नाटक करत असताना संकोच कसला?’’ असा आधार ज्योती चांदेकर यांनी दिला आणि त्यानंतर सगळ्यांनीच सफाईदार अभिनय केला. तेव्हा नवख्या असलेल्या ज्योतीताईंच्या अभिनयाची चुणूक तेव्हाच जाणवली होती, अशा अविस्मरणीय आठवणींना सूर्यकांत जेधे यांनी उजाळा दिला.
वाणेवाडी (ता. बारामती) येथे १९७० ते १९९० पर्यंत दरवर्षी गावातील तरुण तीन अंकी नाटक बसवत आणि परिसरातही प्रयोग होत. बबनराव जेधे यांच्यापासून ते शेतकरी एन. डी. सावंत यांच्यापर्यंत अनेक हाडाचे कलाकार गावात तयार झाले. नुकतेच निधन झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या नवख्या कलाकार असताना त्यांनी वाणेवाडी गावच्या कलाकारांनी केलेल्या नाटकात नायिकेची भूमिका रंगविली होती. तालमींच्या आणि प्रयोगांच्या निमित्ताने त्यांची वाणेवाडीत अनेकदा ये-जा होती. या आठवणींना पोस्ट खात्याकडे निवृत्त अधिकारी सूर्यकांत जेधे यांनी समाजमाध्यमाद्वारे उजाळा दिला असून वाणेवाडीकरांच्या आठवणी जाग्या झाल्या.
सूर्यकांत जेधे काकडे महाविद्यालयात १९७४ मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होते. तेव्हा हनुमान जयंतीनिमित्त हौशी कलाकारांनी ‘पाटलाची पोर’ हे तीन अंकी नाटक बसवायचे ठरवले. ग्रामस्थ मंडळाने लोकवर्गणीतून बाराशे रुपयांची तरतूद केली. त्या काळात उमाजी नाईक, बेलभंडार अशा नाटकांचा अनुभव असलेले बबनराव जेधे यांनी पाटलाची तर वसंतराव जगताप यांनी इन्स्पेक्टरची भूमिका वठविली. जेधे यांनी पाटलाच्या पोराची मध्यवर्ती भूमिका केली. याशिवाय दिवंगत वसंतराव शेळके, गजानन जगताप, बापूराव वाघमारे हे अनुभवी कलाकार होतेच. पण दोन महत्त्वाची स्त्री पात्रे मिळेनात. तेव्हा पुण्यातून दोन स्त्री पात्रे उपलब्ध झाली. तमासगिरीणीची भूमिका बबनरावांचे दिवंगत मित्र विठ्ठलराव भोकसे यांनी वठविली. त्यांच्याच शिष्या ज्योती चांदेकर यांनी तमासगिरणीच्या तरुण मुलीची भूमिका वठविली. दोघेही तालमीसाठी पुण्यावरून येत. हनुमान तरुण मंडळाच्या खोलीत किंवा कै. अप्पासाहेब रामराजे जगताप यांच्या माडीवरती रंगीत तालमी व्हायच्या. अप्पासाहेब पाहुण्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करत. वाणेवाडीसारख्या छोट्या गावात राहून चांदेकरांनी नाटक केले आणि त्याचे दर्जेदार प्रयोग झाले.

तेव्हा रंगीत तालमीलासुद्धा गावकरी उस्फूर्त प्रतिसाद द्यायचे. नाटकात ज्योती आणि माझे हातात हात घेत काही संवाद होते. लाजरा असल्याने मी ते नीट करू शकत नव्हतो. तेव्हा ज्योतीताईंनीच आधार आणि सल्ला दिला. त्या प्रचंड कष्ट घेत आणि तयारीनेच व्यासपीठावर उतरत. स्वतःचे तर सर्व संवाद पाठ करत उलट आम्हालाही प्रॉम्प्टिंग करत. त्यांच्या मार्गदर्शनाने नाटक पंचक्रोशीत गाजले.
सूर्यकांत जेधे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com