अस्तरीकरणाला ग्रामस्थांचा विरोध
सोमेश्वरनगर, ता. १३ : करंजेपूल (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या हद्दीत नीरा डावा कालव्यावर गरजेपेक्षा अधिकचे अस्तरीकरण करू नये, अशी भूमिका घेत अधिक प्रमाणात सुरू असलेले काम शनिवारी (ता. १३) बंद पाडले. इंग्रजकाळापासून कालपर्यंत कालव्याला जेवढे दगडी बांधकाम होते तेवढ्याच अंतरावर अस्तरीकरण करावे, (सिमेंट काँक्रिटीकरण) अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
करंजेपूल ते शेंडकरवाडी या दरम्यान नीरा डावा कालव्यावर एकमोरी, चारमोरी आणि मिनी धबधबा अशा तीन ते चार ठिकाणी अस्तरीकरण करण्यासाठी जलसंपदा विभागाने यंत्रणा उतरवली आहे. इंग्रजकाळापासून कालपर्यंत मिनी धबधबा पट्ट्यात दगडी बांधकाम आणि गेज (पाणी मोजमाप) होते. तेवढ्याच अंतराचे अस्तरीकरण करणार असे, ग्रामस्थांना सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी काणाडोळा केला. मात्र शनिवारी मिनी धबधब्याच्या दोन्ही बाजूला, एकमोरीच्या दोन्ही बाजूला आणि चारमोरीच्या दोन्ही बाजूला अस्तरीकरण करण्यासाठी यंत्रणेने काम सुरू केले. खोदाई पूर्ण करत अस्तरीकरणासाठी मोजमापही केले. यामुळे आता अधिकचे अस्तरीकरण होणार हे ओळखून चाळीसेक ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धाव घेतली. संबंधित कंत्राटदार आणि जलसंपदाच्या वडगाव निंबाळकर शाखेचे अभियंता यांना स्पष्ट शब्दात अधिकचे अस्तरीकरण करू नये, असे सांगितले. जादा कामासाठी अंथरलेले लोखंडी गज काढून टाकण्याचीही मागणी केली. याप्रसंगी करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, उपसरपंच शेखर गायकवाड, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, शिवाजी शेंडकर, लहुसिंग गायकवाड, अंकुश गायकवाड, सागर गायकवाड, नीलेश गायकवाड, नाना गायकवाड, राजू गायकवाड आदी उपस्थित होते.
वैभव गायकवाड व शेखर गायकवाड म्हणाले, इंग्रजकाळापासून जे दगडी बांधकाम किंवा अस्तरीकरण होते तेवढेच करण्यास शेतकऱ्यांनी मान्यता दिली आहे. आधी तेवढेच काम करू म्हणून सुरू करू दिले होते. मात्र आता काम वाढवू लागल्याने शनिवारी बंद केले.
शिवाजी शेंडकर म्हणाले की, इंग्रजांनी व त्यानंतरच्या भारतीय अधिकाऱ्यांनी जी व्यवस्था निर्माण केली ती मोडकळीस आणू नये. कुठल्याही परिस्थितीत अधिकचे अस्तरीकरण होऊ देणार नाही.
सरसकट अस्तरीकरण करणार नाही. फक्त जुन्या काळातील चारमोरी, एकमोरी अशी जी बांधकामे आहेत ती सव्वाशे वर्षांची झाली आहेत. त्याच ठिकाणी अस्तरीकरण करावे लागणार आहे. पुन्हा फूट-तूट झाली तर आम्हीच जबाबदार राहतो.
- बाजीराव पोंदकुले, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग
करंजेपूल (ता. बारामती) : नीरा डावा कालव्याला सुरू असलेले अस्तरीकरण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.