गाळप हंगामाकडे साखर उद्योगाचे डोळे
सोमेश्वरनगर, ता. २० : मागील हंगामाच्या तुलनेत जादा ऊस असल्याने राज्याचा गाळप कधी सुरू होणार याकडे साखर उद्योगाचे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हुमणी, लोकरी मावा अशा रोगांच्या प्रादुर्भावामुळे लवकर ऊस गाळपाला जावा म्हणून कारखाने लवकर सुरू व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सहकार विभागाने मंत्रिसमितीची बैठक २२ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबरवर ढकलल्याने त्या बैठकीनंतरच धोरण कळणार आहे.
राज्याचा हंगाम २०२३-२४ मध्ये अवघा १०० दिवस चालला. अवघे ८५३ लाख टन गळीत होऊन ८० लाख टन साखरनिर्मिती झाली. तो हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आणि विधानसभा निवडणुकीमुळे प्रत्यक्षात १ डिसेंबर उजाडला. परिणामी उसाची पळवापळवी झाली. मोठी गाळपक्षमता असलेल्या कारखान्यांनी याचा फायदा उचलला. आता २०२५-२६ हंगामासाठी जवळपास १२०० ते १२५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याचा साखर आयुक्तालयाचा अंदाज असून ९२ ते १०४ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गतहंगामापेक्षा जादा ऊस असल्याने १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करावेत अशी मागणी होत आहे. विस्मा या साखर कारखान्याच्या संघटनेनेही १५ ऑक्टोबरचीच मागणी केली आहे. यावर परतीच्या पावसाचेही संकट आहे. अशात २ ऑक्टोबरला दसरा आणि २२ ऑक्टोबरला दिवाळी आहे. त्यामुळे १५ ला परवानगी दिली तर २२-२३ ला कारखाने सुरू होऊ शकतील आणि एक नोव्हेंबरला हंगाम सुरळीत होऊ शकेल असे चित्र आहे.
दरम्यान, हंगाम शुभारंभ ठरविण्यासाठी आणि विविध कपाती, एफआरपी थकबाकी, गोपीनाथ मुंडे महामंडळ आदी बाबतीत धोरण आखण्यासाठी मंत्री समितीची बैठक २२ सप्टेंबरला नियोजित होती. मात्र सहकार विभागाने बैठक २९ सप्टेंबरला ढकलली असल्याचे पत्र शुक्रवारी काढले आहे. त्यामुळे आता २९ तारखेकडे सगळ्या साखर उद्योगाचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, येत्या हंगामात समाधानकारक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गाळप परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
मॉन्सून अजून सुरू असून, शेतातील ऊस सध्या बाहेर काढणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होईल. आठ दिवसांनी हवामान, पाऊस याचा अंदाज घेऊन सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा.
- राजू शेट्टी, शेतकरी नेते
उसावर हुमणी रोगाचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. तांबेरा, लोकरी मावा हे रोगही दिसत आहेत. पंचवीस टक्के उत्पादन घटणार आहे. हंगाम लांबला तर उत्पादन आणखी घटेल.
- बिपिन मोहिते, ऊस उत्पादक
संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.