सोमेश्वर कारखाना व व्यावसायिकांमध्ये वादाची शक्यता
सोमेश्वरनगर, ता. ६ : सोमेश्वर कारखाना आणि कारखान्याच्या जागेतील दुकानदार यांच्यात चर्चेद्वारे मध्यम मार्ग काढण्यात आला होता. त्यात ९२पैकी ७८ दुकानदारांनी संमतीही दिली होती. मात्र, काहींनी सहमतीच्या मुद्द्यांमध्येच खोडा घातला आहे, तर काही न्यायालयीन मार्गाची अजूनही चाचपणी करत आहेत. परिणामी कारखाना व्यवस्थापनानेही पुन्हा पोलिसांकडे बंदोबस्त मागविला आहे. परिणामी पुन्हा तणावाची परिस्थिती तयार होणार आहे. यामध्ये सामान्य दुकानदार भरडले जाणार आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या जागेत करंजेपूल-कारखाना रस्त्यालगत ९२ लोक गेली पन्नास- साठ वर्षे व्यवसाय करत आहेत. आता कारखाना नऊ- दहा पट मोठा झाला असून, निर्वेध ऊस वाहतुकीसाठी व विद्यार्थ्यांच्या जिवाचा धोका टाळण्यासाठी रस्ता रुंद करणे अत्यावश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवसायिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली. वार्षिक सभेत सभासदांनी ठोस निर्णय घेतला. संचालक मंडळासोबत चर्चा झाल्या. यानंतरही ५७ व्यावसायिकांनी बारामती न्यायालयात दावा दाखल केला आणि दुसरीकडे कारखान्याने दिवाळीतच दुकानलाईनपुढे पत्रे ठोकण्याची भूमिका घेतली. या परिस्थितीत पोलिस व पत्रकारांच्या मध्यस्थीने उभयपक्षी चर्चेतून मध्यम मार्ग काढण्यात आला. व्यावसायिकांसाठी तीन प्रकारचे गाळे विना अनामत आणि २० रुपये चौरस फूट भाड्याने बांधून देण्याचा निर्णय झाला. सर्वांनी संमतीच्या सह्यादेखील केल्या. सामान्य व्यवसायिकांच्या प्रतिसादाने संमतीधारकांची संख्याही वाढली. मात्र अधिकाधिक जागेची अपेक्षा असलेल्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयीन वाद कायम राहण्याची शक्यता बळावली आहे. यात सभासद उतरल्यास मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
कारखाना व्यवस्थापनाने सांगितले की, सामान्य व्यवसायिकांना सामोपचाराचा तोडगा पटल्याने ७८ जणांनी संमती दिली. त्यातल्या पंधरा- वीस जणांनी कागदपत्रे एकाच्या नावाने आणि संमती दुसऱ्याच्याच नावाने, अशी खेळी केली आहे. तोडग्यावेळी न्यायालयातील दावा मागे घेण्याचे ठरले असताना त्याबाबत कुणाची हालचाल दिसत नाही आणि एकानेही अतिक्रमण काढलेले नाही. जागेची आत्यंतिक गरज असल्याने पोलिस व प्रशासनाने जागा मालक असलेल्या कारखान्यास मदत करणे आवश्यक आहे. संमती देणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
दरम्यान, ज्यांचे मोठे व्यवसाय आहेत त्यांना अधिकची जागा किंवा अधिकचे गाळे मिळायला हवेत. भाडेसुद्धा थोडे जास्तच वाटत आहे, अशी भूमिका व्यवसायिकांनी घेतली आहे. दरम्यान, चार-सहा लोकांच्या हटवादीपणामुळे गोरगरीबांवर गंडातर येऊ नये, अशी अपेक्षा एका व्यावसायिकाने व्यक्त केली.
फुकटचे लोणी
कारखान्याने बारा वर्षात एक रुपयाही भाडे घेतलेले नाही. तत्पूर्वीही तुटपुंजेच भाडे होते. कारखान्याच्या जागेत काहीजण पोटभाडेकरू ठेवून ‘लोणी’ चाखत आहेत. महिन्याला एकजण तब्बल बावीस हजार, तर दुसरे दोघे बारा हजार भाडे घेत आहेत! बहुतांश लोकांनी दिलेल्या जागेपेक्षा भरमसाट अतिक्रमण करत जागा गिळंकृत केल्या आहेत. तर, पंचवीस-तीस कुटुंब व्यवसायाच्या नावाखाली ऐसपैस घरे बांधून राहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

