कर्जमाफीच्या निकषांवर संभ्रम कायम
संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. १० : राज्य सरकारने मागील दोन कर्जमाफींमध्ये केवळ पीक कर्जांनाच कर्जमाफी दिली; मात्र सोसायट्या किंवा शेतकरी खऱ्या अर्थाने अडकतात ते मध्यम मुदत कर्जामध्ये. त्यामुळे मनमोहनसिंग सरकारच्या धर्तीवर मध्यम मुदत कर्जातही मदत झाल्यास शेतकरी व सोसायट्या ऊर्जितावस्थेत येऊ शकतात, असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, कर्जमाफीच्या निकषांबाबत काहीच स्पष्ट नसल्याने भविष्यात जे पात्र ठरणार नाहीत, त्यांना पीक कर्जाला १२ टक्के आणि मध्यम मुदत कर्जाला १३ टक्के व्याज भरण्याची वेळ येणार आहे. राज्य सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्या चर्चेनुसार ३० जून रोजी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, कर्जमाफीच्या रकमेची मर्यादा किती, कर्जमाफी मिळणार कुणाकुणाला, मध्यम मुदत आणि पीक कर्ज दोन्हीचा समावेश होणार का? याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. या संभ्रमामुळे बहुतांश लोक कर्जभरणा टाळणार आणि सोसायट्या तर अडचणीत येणारच आहेत. मात्र, निकषांमुळे भविष्यात जे वगळले जाणार आहेत ते थकबाकीदार ठरणार आहेत. खरीप कर्जदार ३१ मार्चपूर्वी कर्ज नील करतात आणि सहा टक्क्यांऐवजी शून्य टक्के पीक कर्जाचा लाभ घेतात. मात्र, निकष माहीत नसल्याने कर्जभरणा न केल्यास शून्य टक्के सवलतीचा लाभ तर हुकणारच आहे. पण १ एप्रिलपासून त्या संपूर्ण कर्जाला ११ ते १२ टक्के व्याज लागू होणार आहे. तर ऊस, फळबागा यासाठी कर्ज उचललेल्या शेतकरी १ जून २०२६ ला थकबाकीदार होऊन त्यांनाही थकीत व्याजदर लागू होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीत पीक कर्जासह मध्यम मुदत कर्जालाही माफी दिली होती. बँकेकडून सोसायटी व शेतकरी हे सर्वाधिक कर्ज मध्यम मुदतीचेच उचलतात. त्यामुळे मध्यम मुदतही माफ होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कुठलेच निकष नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. पीक कर्जाची माफी असली तरी मध्यम मुदतीबाबतही लोक आशेवर आहेत. त्यामुळे सरकारने स्पष्टता द्यावी.
- हनिफ सय्यद, सचिव, बेलसर सोसायटी
सोसायट्यांच्या कर्जवाटपात पीक कर्ज तीस टक्केच असते. गाय-गोठा, पाइपलाइन, विहीर, ट्रॅक्टर, अवजारे, कुक्कुटपालन आदी कारणांसाठी मध्यम मुदत कर्ज १२ टक्के व्याजाने शेतकरी घेतात. त्या कर्जाला मदत आवश्यक आहे. तसेच साखर कारखान्यांनी कपाती स्वतःकडे ठेवण्यापेक्षा सोसायट्यांकडे द्याव्यात. त्या ठेव स्वरूपात सोसायट्यांकडे राहिल्यास सोसायट्या जिवंत राहायला मदत होईल.
- धन्यकुमार जगताप, सोसायट्यांचे मार्गदर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

