‘भाज्ञाविस’कडून अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना मदत
सोमेश्वरनगर, ता. १६ : भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेच्या बारामती तालुका शाखेच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागातील पाच जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपये खर्चाचे शैक्षणिक साहित्य समक्ष जाऊन वाटण्यात आले. सोलापूरच्या विद्यार्थ्यांना मदत पाठविण्यात येथील परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठा वाटा उचलला.
‘भाज्ञाविस’ने सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण पाण्याखाली गेलेल्या जिल्हा परिषद शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला होता. यास परिसरातील शाळा, संस्था व नागरिकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाणेवाडी न्यू इंग्लिश स्कूल, विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सोरटेवाडी माध्यमिक विद्यालय, बा. सा. काकडे विद्यालय, माध्यमिक विद्यालय खंडोबाचीवाडी, पांढरवस्ती न्यू इंग्लिश स्कूल, उत्कर्ष आश्रमशाळा, वाणेवाडी साद संवाद ग्रुप, समाजसेवा व्हॉट्सॲप, स्वाभिमानी मराठा व्हॉट्सॲप ग्रुप आणि मेडिकल ग्रुप वाणेवाडी यांनी यामध्ये मोलाचा सहभाग दिला. याशिवाय अनेक संवेदनशील व्यक्तींनीही मदत केली.
संकलित निधी आणि वस्तूंमधून भाज्ञाविसने सुमारे ६०० रुपये किमतीचे दोनशे शैक्षणिक संच तयार केले. संचामध्ये दफ्तर, दोन तळीचा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, वह्या, चित्रकला वही, तेल-खडू पेटी, पेन-पेन्सिल पाऊच, पट्टी, खोडरबर, शार्पनर, अंकलिपी, रायटिंग पॅड या वस्तूंचा समावेश होता. नांदगाव, रामहिंगणी, पांडवनगर, बंडगरवस्ती, लांबोटी या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटण्यात आले.
विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा
सोमेश्वरनगर परिसरातील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी स्वतःचे खाऊचे पैसे तर दिलेच. शिवाय आजूबाजूच्या व्यापारी पेठेत फिरून, घरोघरी जाऊनही लोकवर्गणी जमा केली. सोमेश्वर विद्यालयाच्या मुलांनी १४ हजार, तर वाणेवाडी विद्यालयाच्या मुलांनी तब्बल १० हजार जमा केले. रमाई बचत गटाच्या महिलांनी आणि उत्कर्ष आश्रमशाळेच्या मुलांनी केलेली मदत कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. दत्तात्रेय हेगडे या निवृत्त शिक्षकाने ८० गणवेश दिले.
लांबोटी (ता. मोहोळ जि. सोलापूर) ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी.
05086
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

