राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत ‘अजेय’

राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत ‘अजेय’

Published on

सोमेश्वरनगर, ता. १८ : बारामती तालुक्यातील वाणेवाडीसारख्या ग्रामीण भागातील अजय हिंदुराव भोसले या दिव्यांग जलतरणपटूने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सलग तीन वर्षे ‘अजेय’ राहत चक्क सुवर्णपदकाची हॅट्‌ट्रिक केली आहे. हैदराबाद येथे महाराष्ट्राकडून खेळताना ‘राष्ट्रीय पॅरा जलतरण चँपियनशिप स्पर्धेत अजयने २०० आयएम (वैयक्तिक एकात्मिक पोहणे) स्पर्धेत सुवर्णपदक तर पटकावले. शिवाय तब्बल तीन रौप्यपदके पटकावण्याचाही पराक्रम केला आहे.
अजयने चालू वर्षी राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल, २०० आयएम या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे तो राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचला. हैदराबाद येथे नॅशनल पॅरा ऑलिंपिक कमिटी आणि तेलंगणा पॅरा स्वीमिंग असोसिएशनच्या वतीने २५ व्या ''नॅशनल पॅरा स्वीमिंग चॅंपियनशीप-२०२५-२६'' स्पर्धा झाल्या. यामध्ये अजयने २०० आयएम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. याशिवाय ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. यापूर्वी गोवा येथे पार पडलेल्या २४ व्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने २०० आयएम, ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल या तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तर २३ व्या राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. सलग तीन वर्षांच्या यशामुळे त्याला आशियायी स्पर्धेचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पुढील तयारीसाठी तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. अजय गावाकडच्या विहिरीत आणि कालव्यात उत्तम पोहायचा. २०१४ साली दुचाकीवर अपघात झाला आणि नडगीपासून खालचा एक पाय गमवावा लागला. टीव्हीवर जलतरण स्पर्धा पाहून आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास होता पण आर्थिक परिस्थितीमुळे खेळणे रखडले होते. अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, खेळाडू शशिकांत जेधे, पॅरा ऑलिंपिकपटू सुयश जाधव यांच्या मदतीने अजय पुण्यातील डेक्कन अॅक्वेटीक्स क्लबमध्ये पोहोचला. प्रशिक्षक स्वजस गोडसे, शौर्य करंदीकर यांनी त्याच्या खेळाला पैलू पाडले आणि गावाकडच्या अजयने देशात नावलौकिक मिळविला. खेळाडू शशिकांत जेधे म्हणाले, ‘‘अजय ऑलिंपिकपर्यंत पोहोचू शकतो. मात्र त्याला मदतीची नितांत गरज आहे.’’


SOM25B05092

Marathi News Esakal
www.esakal.com