सोरटेवाडीत भव्य झाडांवर विनाशाची करवत
सोमेश्वरनगर, ता. १९ : ‘पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी, एकेक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी’ कवी ग्रेस यांच्या या ओळींमधून जी वेदना प्रकट झाली आहे, ती नीरा-बारामती रस्त्याने सोरटेवाडी येथून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजातही उमटत आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी सोरटेवाडीतील दोन अतिभव्य वड आणि एका चिंचेवर यंत्रकरवत चालली. यामुळे तिन्ही झाडांच्या कुशीत १०० वर्षांपासून सुरक्षित असलेल्या हजारो लेकरांचे (वटवाघळांचे) घर उद्ध्वस्त झाले आहे.
नीरा-बारामती रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास साडेतीन हजार भव्य वृक्षांचे शिरकाण करण्यात आले. अन्य पर्याय शोधण्याऐवजी वृक्षतोडीचा सोपा मार्ग निवडल्याने पर्यावरणप्रेमी हळहळत होते. वृक्षतोड करणाऱ्या हुशार यंत्रणेने वटवाघळांच्या वसतीस्थानाला अगदी शेवटी हात घातला. सोरटेवाडीतील कुलकर्णी चारीतून सतत मुबलक पाणी वाहत असते. या सोयीमुळे चारीशेजारील दोन भव्य वडांवर आणि एका चिंचेवर सुमारे आठ-दहा हजार वटवाघळे दिवसभर उलटी लटकत असताना प्रवाशांना दिसायची. त्या झाडांखालून जाताना वटवाघळांची फडफड, या फांदीवरून त्या फांदीवर जायची धडपड आणि चिरके चित्कार कानावर पडायचे आणि प्रवासी आपसूक वर पाहत जायचा. नीरा डावा कालव्याचा पाझर बारा महिने कुलकर्णी चारीने वाहत असतो. शिवाय कालवाही अवघा अर्धा-पाऊण किलोमीटरवर असल्याने वटवाघळांनी चारीशेजारील झाडांवर घर केले होते. अखेर मागील महिन्यात एक वड तोडला आणि वटवाघळे उरलेल्या वड आणि चिंचेवर दाटीवाटीने राहू लागली होती. शेवटी मागील आठवड्यात यंत्रकरवतीने उरलेल्या दोन्ही झाडांची निघृणपणे कत्तल केली गेली.
वटवाघळे रात्रीची बाहेर पडतात पण दिवसा झाड तोडले जात असताना हजारो वटवाघळे वेदनेने चित्कारत आकाशात घिरट्या घालत होती. झाड तुटल्यानंतरही दोन दिवस वटवाघळे घिरट्या घालताना दिसायची. मूक वटवाघळांनी कुठल्याही बंगल्यापुढे, नेत्यांपुढे किंवा प्रशासकीय कार्यालयापुढे धरणे धरले नाही आणि न्यायालयात दादही मागितली नाही. कमकुवत पिल्लांना सोडून ती नवीन आसरा शोधण्यासाठी परागंदा झाली आहेत.
- प्रमोद पानसरे, पर्यावरण प्रेमी
ही फ्लाइंग फॉक्स जातीची शाकाहारी वटवाघळे होती. झाडांच्या बेचकीत काही मांसाहारी वटवाघळेही होती. २०११ साली केलेल्या गणनेत एका झाडावर ११०० वटवाघळे आढळली होती. हे त्यांचे अंदाजे १०० वर्षांपासूनचे वसतिस्थान होते. शेजारच्या चारीत किंवा कालव्यात रात्रीचे पंख ओले करतात, पाणी पितात. त्यांनी ४० किलोमीटर परिसरात फळे खाऊन सर्वत्र बिया पसरून वृक्षारोपणाचे मोठे काम केले होते.
- डॉ. महेश गायकवाड, वटवाघळांचे अभ्यासक
5097
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

