संविधान दिनानिमित्त आज
ग्रामपंचायतींत विविध उपक्रम

संविधान दिनानिमित्त आज ग्रामपंचायतींत विविध उपक्रम

Published on

सोमेश्वरनगर, ता. २५ : तालुका स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर बुधवारी (ता. २६) विविध उपक्रमांद्वारे संविधान दिन साजरा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी बजावले आहेत. यानमित्ताने संविधान रॅली, पथनाट्ये, नाटिका, प्रभातफेरी अशा उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे.
भारत सरकारने २६ नोव्हेंबरला संविधानाचा स्वीकार केला होता. यानिमित्ताने लोकशाहीच्या व संविधानाच्या बळकटीकरणासाठी पंचायत राज संचालक यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात सविस्तर सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. प्रत्येक गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी उद्देशिका भिंत तयार करावी लागणार आहे. यामध्ये राज्यातील वारली अथवा इतर स्थानिक परंपरांचे चित्रण करावे. यासाठी स्थानिक कलाकार, बचत गट, युवक आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा सहभाग घ्यावा, असे सूचित केले आहे. समारंभात उद्देशिका वाचन पारंपारिक वेशभूषेत करावे, वाचनासाठी शासनाने मंजूर केलेली अधिकृत प्रत वापरावी, अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच, यानिमित्ताने पथनाट्ये, नाटक, रॅली, घोषवाक्ये, प्रभातफेरी, असे उपक्रमही ग्रामपंचायतींना राबविता येणार आहे. जिल्ह्यात सर्वोत्तम ठरलेल्या तीन उद्देशिका भिंतीची निवड केली जाणार असून, त्यांची छायाचित्रे व व्हिडिओ २६ जानेवारीच्या मंत्रालयातील प्रदर्शनासाठी पाठविल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत राज्य व केंद्रस्तरावरून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था ग्रामपंचायत व पंचायत समितीत करावी, असेही पत्रात म्हटले आहे.

सरकारी कार्यालयांना बंधन
प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका पंचायत याशिवाय जिल्हा पंचायत प्रशिक्षण केंद्र (डीपीआरसी व पीआरसीटी), ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र (जीटीसी, डीआरएमयू), तसेच पंचायत लर्निंग सेंटर (पीएलसीएस) येथेही संविधान दिन उपक्रमाचे आयोजन करणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे स्वयंसेवक व मॉडेल जीपी क्लस्टर्स यांनीही ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात सहभाग घेणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com