जिल्ह्यातील २०२३ शाळा बंद
सोमेश्वरनगर, ता. ६ : वेतनकपातीच्या इशाऱ्याला न जुमानता ‘टीईटी’ सक्तीच्या आणि ‘संचमान्यता’ आदेशाच्या विरोधात विविध संघटनांच्या शिक्षकांनी पुणे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालावर शुक्रवारी मोर्चा काढला होता. आता यापेक्षाही भव्य मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर नेण्याचा निर्णयही शिक्षकांनी घेतला आहे. या आंदोलनामुळे पुणे जिल्ह्यातील ३५४६ पैकी २०२३ शाळा बंद राहिल्या तर दहा हजारपैकी तब्बल ५२५७ शिक्षक सामूहिक रजेवर गेले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) संजय नाईकडे यांनी दिली.
‘आम्हाला शिकवू द्या’ अशा घोषणा देत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘पुणे जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती’च्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, मुख्याध्यापक महामंडळचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर, शिक्षकेतर संघटनेचे राज्यसचिव शिवाजी खांडेकर, पेन्शन संघटनेचे संजय पापळे यांची प्रमुख भाषणे झाली. याप्रसंगी सुनील वाघ, खंडेराव ढोबळे, संदीप जगताप, प्रसाद गायकवाड, के. डी. डोमसे, संतोष गदादे, संजय कांबळे, राजेंद्र जगताप, सुनील जगताप, सचिन डिंबळे आदी उपस्थित होते.
आंदोलनात शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक महामंडळ, केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन संघटना, वस्तीशाळा शिक्षक संघटना, शिक्षक सेना, संस्थाचालक शिक्षण मंडळ, मागासवर्गीय शिक्षक संघटना आदी संघटना सहभागी झाल्या, अशी माहिती नंदकुमार होळकर यांनी दिली.
दरम्यान, यामुळे जिल्ह्यात दोन हजारपेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा बंद राहिल्या तर उरलेल्या बहुतांश शाळांमध्येही शिक्षकसंख्या घटल्याने कामकाज विस्कळित झाले. काही माध्यमिक विद्यालयेही बंद राहिली तर काहींनी ‘सकाळ’ सत्रात विद्यालये भरविली.
टीईटीच्या दबावाने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यावर परिणाम होतोय आणि संचमान्यता आदेशाने ग्रामीण शाळा बंद पडतील म्हणून तरी शासनाने दखल घ्यावी. अन्यथा पुढील टप्प्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व शिक्षकांचा मोर्चा नेण्याचा निर्णय झाला आहे. त्यातही प्रश्न प्रलंबित राहिल्यास मुंबईतील आझाद मैदानावर व मंत्रालयावर मोर्चे काढले जातील, अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिली.
या आहेत प्रमुख मागण्या
सेवेतील शिक्षकांना ‘टीईटी’तून वगळावे
नवा संचमान्यता आदेश मागे घ्यावा
जुनी पेन्शन मिळावी
शिक्षणसेवकांना नियमित वेतन मिळावे
शिक्षकेतर कर्मचारी भरती करावी
शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

