शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
सोमेश्वरनगर, ता. ९ ः वीजकंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभागीय कार्यालयाच्या सर्व सहा शाखांमध्ये गावठाणासाठी २४ तास ‘थ्री फेज’ वीज आणि शेतकऱ्यांसाठी आठ तास दिवसा वीज देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. सद्यःस्थितीतील नऊपैकी चार सबस्टेशनवर प्रत्यक्षात काही ठिकाणी शेतकऱ्यांना आठ तास दिवसा वीज मिळाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. आता घरगुती व व्यवसायासाठीही २४ तास वीज मिळून उद्योग, व्यवसायिकांच्या चाकांना गती मिळणार आहे.
बारामतीचा बहुतांश ग्रामीण भाग सोमेश्वरनगर उपविभागीय कार्यालयांतर्गत येतो. त्याअंतर्गत निंबूत, सोमेश्वर, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, मोरगाव, सुपे अशी सहा शाखा कार्यालये आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतून या उपविभागात शेतकऱ्यांना दिवसा आणि व्यावसायिकांसाठी २४ तास थ्री फेज वीज या मोहिमेसाठी निधी आणि यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. रात्रीचे भिजणे करताना बिबट्या, लांडगे, तरस, साप, थंडी यांच्या भयाने शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले होते. तसेच करंजेपूल, वडगाव, कोऱ्हाळे, सुपे, मोरगाव अशा व्यापारी पेठांतील व्यवसायिकांची चाके १६ तास बंद राहत होती. मात्र, आता हे दोन्ही प्रश्न टप्प्याटप्प्याने मिटणार आहेत.
सहा शाखांअंतर्गत नऊ सबस्टेशन आहेत. त्यापैकी करंजे सबस्टेशनच्या परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे. तसेच मुरूम सबस्टेशनला ५ मेगावॉट सोलर प्रकल्प दिल्याने तिथेही शेतकऱ्यांना आठ तास दिवसा वीज मिळत आहे. मुर्टी आणि मोरगाव या सबस्टेशनवरील कामही अंतिम टप्प्यात आहे. वडगाव निंबाळकर सबस्टेशनवर लवकरच १० मेगावॉट सौर ऊर्जा मिळणार असल्याने काम सुरू झाले आहे. चोपडजमध्ये काही लोकांचा अडथळा आला आहे. तो निवळल्यावर वाकी- चोपडजचा शेतकरीही समाधानी होणार आहे.
याबाबत शेतकरी व सरपंच भाऊसाहेब हुंबरे म्हणाले, ‘‘आमच्या शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी वीजकंपनीला प्रतिसाद दिल्याने गतीने काम झाले. करंजे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा विजेमुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे. फक्त ती आठ तास वीज विनाखंड देणे अत्यावश्यक आहे.’’
याबाबत उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे व सहायक अभियंता तथा समन्वयक दिलीप जाधव म्हणाले, ‘‘सर्व नऊ सबस्टेशनवर शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि उद्योग- व्यवसायिकांना २४ तास थ्री फेज वीज द्यायचे उद्दिष्ट आहे. याने ग्रामीण भागाची प्रगती होईल. रुग्णालये, लघुउद्योजक, व्यवसायिकांना मोठी मदत होईल. जिथे ग्रामस्थांचे सहकार्य आहे, तिथे वेगाने काम होत आहे. उर्वरित ठिकाणीही ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतींचे सहकार्य अपेक्षित आहे.’’
05158
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

