‘निंबूत- कांबळेश्वर’मध्ये राष्ट्रवादीकडून मताधिक्याचे विक्रम
सोमेश्वरनगर, ता. १२ : जिल्हा परिषद निवडणुकीत निंबूत- कांबळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपतील लढत एकतर्फी झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार करण खलाटे, तसेच पंचायत समितीच्या उमेदवार आशाबाई वायाळ व दिग्विजय जगताप यांनी भाजप उमेदवारांचे पानिपत करत मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
होळ- सांगवी जिल्हा परिषद गटातून सन २००८मध्ये संभाजी होळकर हे तब्बल १६ हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आले होते. ते तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य होते. त्यानंतरच्या सन २०१३च्या निवडणुकीत होळ- सांगवी गटाची मोडतोड झाली. नव्या निंबूत- मुर्टी गटातून राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीच्या उमेदवार सविता काकडे निवडून आल्या होत्या. सन २०१७मध्ये निंबूत- कांबळेश्वर गटनिर्मितीनंतर राष्ट्रवादीचेच प्रमोद काकडे यांनी १२ हजार ७०० मतांच्या मताधिक्याने एकतर्फी विजय प्राप्त केला होता. तरीही भाजपच्या इंद्रजित भोसले यांना पाच हजारांपेक्षा अधिकची बऱ्यापैकी मते मिळाली होती.
आताच्या निवडणुकीत बारामतीचे माजी सभापती करण खलाटे यांनी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे यांच्यावर १९६२४ मतांच्या फरकाने प्रचंड विजय संपादन केला आहे. दिग्विजय काकडे यांना घरच्या निंबूत गणामध्ये १८९१ इतकी बरी मते मिळाली, मात्र कांबळेश्वर गणात अवघी ७८८ मते मिळाली. खलाटे यांना कांबळेश्वर गणात १२१७३, तर निंबुत गणात १०००८ मतांचे भरभरून दान मिळाले.
पंचायत समितीच्या निंबूत गणात माजी सरपंच दिग्विजय जगताप यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख स्वप्नील जगताप यांना ६९२० मतांनी, तर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पी. के. जगताप यांना ७५६१ मतांनी पराभूत केले. पी. के. जगताप सन २००८च्या निवडणुकीत अवघ्या ४० मतांनी पराभूत झाले होते. महादेव जानकर यांचे कार्यकर्ते जालिंदर लकडे यांना ३२८, तर अपक्ष केतन भोसले यांना ३६२ मते पडली. कांबळेश्वर गणात माजी सरपंच आशाबाई वायाळ यांनी भाजपच्या लैला शेख यांचा सरळ लढतीत ११४५७ मतांनी दारूण पराभव केला.
अजितदादांबद्दलची सहानुभूती, सोमेश्वर कारखान्याच्या प्रभावाचा पट्टा, तुतारीची मनापासून साथ, राष्ट्रवादीची बलाढ्य ताकद यामुळे मताधिक्याचे विक्रम घडले. आता दिग्विजय जगताप हे तालुक्याच्या सभापतिपदाच्या तर करण खलाटे हे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या व सभापतिपदाच्या शर्यतीत आहेत. या गटाच्या संभाजी होळकर, प्रमोद काकडे यांनी याआधी बांधकाम सभापतिपद भूषविले आहे.

