सुपे परिसरातून पूरग्रस्तांना मदतीचा हात
सुपे, ता. ५ : सुपे (ता. बारामती) व परिसरातील गावांमधून अतिवृष्टीग्रस्त गावांना रोख रक्कम व दैनंदिन गरजेच्या वस्तू, चार गाड्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या.
मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यामुळे शेतीसह शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी संघर्ष कृती समिती व सुपे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी यांनी एक हात मदतीचा या संकल्पनेतून जवळपास चार गाड्या धान्य, किराणा, कपडे मिळून सुमारे १२ टन दैनंदिन लागणारे साहित्य पाठविले आहे. त्यापैकी दोन गावांमध्ये ३०० किट वाटप करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ सुपे परगणा यांच्यावतीने पूरग्रस्त भागातील बंधू- भगिनींसाठी निधी संकलन करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह काढलेल्या मदत फेरीतून मिळून सुमारे १८ हजार रुपये निधी संकलन झाले. या उपक्रमात श्री शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे काही शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. हा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री निधीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.