कुतवळवाडीत शेतकरी उभारणार मका प्रक्रिया उद्योग

कुतवळवाडीत शेतकरी उभारणार मका प्रक्रिया उद्योग

Published on

सुपे, ता. ९ : कुतवळवाडी (ता.बारामती) येथील माऊली कृषी उत्पादक संस्थेच्या सभासदांनी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा स्वीट कॉर्न (मधू मका) प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चांदगुडे, मुख्याधिकारी अमित कुतवळ यांनी ही माहिती दिली.
सुपे येथे संस्थेची तिसरी सर्वसाधारण सभा पार पडली. पुण्यातील महाएफपीसीचे तज्ञ राहुल गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. मुख्याधिकारी कुतवळ यांनी विषय वाचन केले. मधुमकेवर प्रक्रिया करणारा या परिसरातील पहिलाच उद्योग आहे. याआधी मका विक्रीसाठी बाहेर पाठवावी लागायची. त्यामुळे वाहतूक खर्च व्हायचा. आता वाहतूक खर्चात बचत होणार असल्याने नफ्यात वाढ होणार आहे. त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. गत वर्षी संस्थेमार्फत सुमारे १६९ टन स्वीट कॉर्नची खरेदी-विक्री करण्यात आली होती. चालू वर्षात सुमारे ३०० टनाचे खरेदी-विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. संस्थेचा स्वीट कॉर्न प्रकल्प व ड्रोन व्यवसायापासून २९ लाख, ५६ हजार, ६१४ रुपये उलाढाल झाली. यापासून २ लाख, ६२ हजार, ६१४ रुपये नफा मिळाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
मधू मकेचे एकरी सात ते दहा टन उत्पादन होते. वर्षातून तीनही हंगामात मकेचे पीक घेता येते. पैकी खरीप व रब्बी हंगामातील मकेला तुलनेने चांगला बाजार भाव मिळतो, अशी माहिती अध्यक्ष चांदगुडे यांनी दिली.
दरम्यान, संस्था कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झालेले नूतन अध्यक्ष प्रकाश चांदगुडे, उपाध्यक्ष अरुण कुतवळ, संचालक सुभाष चांदगुडे, नितीन कुतवळ, सागर चांदगुडे, हृषिकेश काकडे, बबन देवकाते, रूपाली मचाले, निकिता कुतवळ, शीतल चिपाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com