
विळ्याचा धाक दाखवून पिंपरखेड येथे घरफोडी
शिरूर, ता. २० : पिंपरखेडजवळील (ता. शिरूर) पंचतळे परिसरात चोरट्यांनी शुक्रवारी (ता. २०) पहाटे तीनच्या सुमारासदरवाजा तोडून एका घरात प्रवेश केला आणि तेथील महिलेला विळ्याचा दाख दाखवून अंगावरील व कपाटातील दागिने व चीजवस्तू मिळून चार लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी रेश्मा संतोष जाधव यांनी फिर्याद दिली असून, शिरूर पोलिसांनी चार चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव या पती व मुलासमवेत घरात झोपल्या असताना पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या आवाजाने जागे झालेल्या रेश्मा जाधव यांना त्यांनी विळ्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून, ‘तुमच्याकडे असलेले सर्व पैसे व कपाटाच्या चाव्या द्या,’ असे म्हणत धमकावले. अंगावरील दागिनेही त्यांनी जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर कटावणीने कपाटाचे लॉकर तोडून तेथूनही काही दागिने हस्तगत केले. यात रेश्मा यांच्या अंगावरील व कपाटातील नेकलेस, कर्णफुले, गळसर, मंगळसूत्र असे आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच मोबाईल, घड्याळ असा तीन लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज व १५ हजार रुपये रोख आणि दुसऱ्या खोलीतील एक लोखंडी पेटी घेऊन चोरट्यांनी पळ काढला. त्यांनी मोबाईलही नेल्याने जाधव कुटुंबीयांना मदतीसाठी कुणाशी संपर्क साधता आला नाही. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे फौजदार सुनील उगले, पोलिस हवालदार अनिल आगलावे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी लोखंडी पेटी व त्यातील कपडे जवळील शेतात फेकून दिल्याचे आढळले.