
शिरूरमधील प्रशासकीय कामकाजात विस्कळितपणा
शिरूर, ता. २८ : शिरूर तालुक्याच्या प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, प्रशासकीय कामकाजात विस्कळितपणा आला आहे. ‘प्रभारीभरोसे’ प्रशासनामुळे सामान्यांची कामे रखडत चालली आहेत.
तालुका प्रशासनाचे प्रमुखपद असलेले तहसीलदारपद गेल्या दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्याकडे असून, सुरवातीची आठ महिने (८ ऑगस्ट २०२२ पर्यंत) रंजना उबरहांडे व त्यानंतर आजअखेर प्रशांत पिसाळ यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता. आमदार अशोक पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, शिवसेनेचे युवा नेते अविनाश घोगरे यांनी नियमीत तहसीलदार मिळण्यासाठी आवाज उठविला. आमदार पवार यांनी त्यासाठी उपोषणाचा इशारा दिला, तर शेवाळे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिला. प्रभारी तहसीलदारांमुळे सामान्य जनतेची दैनंदिन कामे होत नसल्याने, तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना गाजर वाटण्याचा इशारा मनसेने दिला होता.
या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यासाठी कायम तहसीलदार मिळण्याची अपेक्षा असतानाच मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पिसाळ यांच्या जागी बालाजी सोमवंशी यांची प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. पिसाळ यांच्याकडे यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक तहसीलदार म्हणून चार्ज होता. पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने त्यांना पूर्णवेळ जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्याचे आदेश देतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतील तहसीलदार सोमवंशी यांच्याकडे शिरूरच्या तहसीलदारपदाचा पदभार सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले.
शिरूरच्या तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेतील नायब तहसीलदारपद रिक्त आहे. शिवाय महसूल विभागाच्या नायब तहसीलदारांचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे. तहसील कार्यालयासाठी नऊ अव्वल कारकून मंजूर असले, तरी आणि त्यातील आठ पदे भरली असली, तरी गेल्या वर्षभराहून अधिक काळ चारच अव्वल कारकून कार्यरत आहेत. चारजण इतर कार्यालयांत स्थानांतरीत केले असून, त्यांचा पगार मात्र शिरूर तहसील कार्यालयातूनच निघत आहे. महसूल सहायकांची १५ पदे मंजूर असून, दहा कार्यरत आहेत. कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असल्याने कामकाजात मोठ्या प्रमाणात विस्कळितपणा व शिथिलता आल्याचे चित्र आहे.
शिरूर तालुक्याला प्रशासकीय अधिकारी देताना जी हेळसांड केली जात आहे, त्यास शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच; यापूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकारही तेवढेच जबाबदार आहे. तालुक्यातील अनेक खात्यांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत चालवावा लागणे हे सरकार व राज्यकर्त्यांचे अपयश आहे.
- नाथा शेवाळे, प्रदेशाध्यक्ष, जनता दल