
विहिरीत मोटार कोसळून चालक ठार
शिरूर, ता. ६ : भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. शिरूर-पाबळ रस्त्यावर अण्णापूर (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. ६) सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत वेळीच मदत न मिळालेल्या मोटारचालकाचा मृत्यू झाला. राहुल गोपीनाथ पठाडे (वय ४०, रा. आखेगाव रोड, शेवगाव, ता. शेवगाव, जि. नगर) असे या दूर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पठाडे हे त्यांच्या ताब्यातील अल्टो के टेन या मोटारीतून (क्र. एमएच १६ एटी १६६२) सुरवातीला शिरूरहून मलठणच्या दिशेने गेले. मात्र, मधेच आमदाबाद फाट्यावरून मोटार वळवून पुन्हा शिरूरच्या दिशेने जात असताना अण्णापूरजवळ नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटार रस्त्यापासून १५ फुटांवर असलेल्या कठडे नसलेल्या विहिरीत कोसळली. तर, ही मोटार एका उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून विहिरीत पडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मोटार विहिरीत पडल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी गावात पळत जाऊन ही दुर्घटना काही ग्रामस्थांना सांगितली. त्यावर सरपंच किरण झंजाड, सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज, गोविंद कुरंदळे, हरीश झंजाड, संतोष झंजाड, शेखर झंजाड, गुलाब रासकर, विलास कुऱ्हे, मच्छिंद्र झंजाड, श्रीकांत वाळूंज, नितीन झंजाड, किरण पवार, किरण चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी मशिनच्या साहाय्याने मोटार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, यात बराच वेळ गेल्याने पठाडे यांचा मोटारीत अडकून बुडून मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, असे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी सांगितले.
धोकादायक विहिरी
या दुर्घटनेनंतर रस्त्याकडेच्या, कठडे नसलेल्या विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिरूर- पाबळ, शिरूर-न्हावरे व इतरही छोट्या-मोठ्या रस्त्यांकडेला कठडे नसलेल्या अनेक विहिरी असून, त्या वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. शिरूरजवळील आनंद सोसायटी, कान्हूर मेसाई, सोनेसांगवी येथेही यापूर्वी कठडे नसलेल्या विहिरींत मोटारी, टेम्पो पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.