
शिरूरमध्ये कामगाराचा वायरचा करंट लागून मृत्यू
शिरूर, ता. २३ : शिरूर बाह्यवळणावरील हॉटेलच्या वर पत्रा बसविण्याचे काम करत असताना ड्रील मशिनच्या वायरचा करंट लागून कामगाराचा मृत्यू झाला. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विक्रम रामब्रीज राजभर (वय ३२, रा. संस्कृती पार्क, कारेगाव, ता. शिरूर), असे या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ धर्मेंद्र रामब्रीज राजभर याने शिरूर पोलिसांना खबर दिली. मूळचे मयारी कल्याणपूर (ता. मधुबन, जि. महू, उत्तर प्रदेश) येथील राहणारे विक्रम व धर्मेंद्र हे बंधू गेल्या काही महिन्यांपासून कारेगाव येथे वास्तव्यास होते व वेल्डींग व इतर कामे करून उदरनिर्वाह करीत होते. शिरूर बाह्यवळणावरील ‘हॉटेल संग्राम’च्या शेडला पत्रा बसविण्याचे काम चालू असताना ड्रील मशिनने ॲंगलला छिद्र घेत असताना विक्रम याला वायरचा करंट बसला. त्यात गंभीर जखमी झाल्याने सहकारी कामगारांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शिरूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस नाईक नाथसाहेब जगताप करीत आहेत.