‘बेकार्ट’ कंपनीतील कामगाराचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बेकार्ट’ कंपनीतील कामगाराचे उपोषण
‘बेकार्ट’ कंपनीतील कामगाराचे उपोषण

‘बेकार्ट’ कंपनीतील कामगाराचे उपोषण

sakal_logo
By

शिरूर, ता. १ : रांजणगाव एमआयडीसीतील ‘बेकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या कंपनीने किरकोळ कारणांवरून बडतर्फ केलेल्या औदुंबर नामदेव काशीद यांनी याविरुद्ध कोर्ट, कचेऱ्या, कामगार न्यायालय व लोकप्रतिनिधींसह अनेकांचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने अखेर पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे. उघड्यावरील या उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी त्यांची प्रकृती काहीशी खालावली.
याबाबत काशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते २००७ ते २०१५ दरम्यान कंपनीत प्रॉडक्शन ऑपरेटर पदावर काम करीत होते. स्टील कॉर्डचे प्रॉडक्शन असलेल्या या कंपनीतील कामादरम्यान गॉगल न वापरणे, मोबाईलवर बोलणे व क्वालिटी चेकींगदरम्यान ठपका ठेवून व्यवस्थापनाने १२ मार्च २०१५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि १३ एप्रिल २०१५ ला आरोपपत्र दिले. नोटीस व आरोपपत्राला रीतसर उत्तर देऊनही खातेनिहाय चौकशी करून १५ जुलै २०१५ ला बडतर्फ केले.
दरम्यान, रीतसर परवानगी घेऊन सोमवारपासून (ता. २७ फेब्रुवारी) कंपनीसमोर सनदशीर मार्गाने उपोषण सुरू केले असता व्यवस्थापनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांना दमदाटी केली. हाकलून देण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे केली.

काशीद यांना कंपनी व्यवस्थापनाने गैरवर्तणुकीच्या कारणास्तव चौकशी करून बडतर्फ केले होते. कंपनीच्या या निर्णयाविरोधात ते कामगार न्यायालयात गेले होते. परंतु, तेथील तारखांनाही ते हजर राहात नसल्याने निकालाला उशीर झाला आणि न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे.
- नंदकुमार चव्हाण, इंडस्ट्रिअल रिलेशन ऑफिसर, बेकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लि.