
ढोकसांगवी येथील दोघांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
शिरूर, ता. ७ : रांजणगाव (ता. शिरूर) ‘एमआयडीसी’तील कंपनीत माल खाली करण्यासाठी आलेल्या ट्रक चालकांकडून माथाडीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अमोल शिवाजी मलगुंडे व प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे (दोघे, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर), अशी खंडणीखोरांची नावे असून, त्यांना शिरूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
इम्तियाज मुस्ताक साह (रा. कानामाऊ पो. खुटहन जी. जौनपूर उत्तर प्रदेश) या सध्या कळंबोली येथे राहणाऱ्या चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ६) सकाळी ते लोखंडी कॉईलने भरलेला ट्रक घेऊन ‘एमआयडीसी’तील ‘झामिल स्टील इंडिया प्रा.लि.’ या कंपनीत खाली करण्यासाठी आले असता अमोल मलगुंडे व प्रज्वल मलगुंडे यांनी, ‘कंपनीमध्ये गाडीखाली करण्यासाठी माथाडी बोर्डाची पावती पाडावी लागेल,’ असे सांगून आमच्याकडून संगनमताने प्रत्येकी चारशे रुपये, असे एकूण आठशे रुपयांची खंडणी घेऊन आम्हास ‘जय मल्हार इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस’ या नावाची माथाडी बोर्डाचा कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्या.