वडनेर येथे दहा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या साहित्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडनेर येथे दहा शेतकऱ्यांच्या
वीज पंपांच्या साहित्यांची चोरी
वडनेर येथे दहा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या साहित्यांची चोरी

वडनेर येथे दहा शेतकऱ्यांच्या वीज पंपांच्या साहित्यांची चोरी

sakal_logo
By

शिरूर, ता. ९ : एकाचवेळी दहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीचे पॅनल, तांब्याच्या तारा व स्टार्टर, असे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी (ता. ८) रात्री वडनेर (ता. शिरूर) येथे घडली. उन्हाळ्याच्या तोंडावर पिकांना पाणी देण्याच्या ऐन मोक्याच्या वेळी हे साहित्य चोरीला गेल्याने मोटारी बंद पडल्या असून, शेतकरी हवालदील झाले आहेत.
याबाबत अनिल रामदास वाजे (रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल रामदास वाजे (रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर) यांनी त्यांच्या विहिरीवर विद्युत मोटार बसविली होती. ते बुधवारी रात्री उशिरा वीजपंप चालू करण्यासाठी गेले असता वीजपंपाचा स्टार्टर, त्याला जोडलेली केबल तसेच पॅनल बॉक्स फोडून मोटारीतील तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचे एकट्याचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, साळभाऊ सीताराम निचित, संतोष दशरथ राऊत, समाधान उत्तम राऊत, भगवान नाथा दळवी, बन्सी मल्हारी निचित, संपत काशिनाथ निचित, एकनाथ हरी निचित, किसन महादू निचित व संदीप विठ्ठल निचित या शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीवर लावलेल्या वीजपंपाच्या केबल, तांब्याच्या तारा, स्टार्टर चोरीला गेल्याने उघडकीस आले. चोरट्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर पाणीपुरवठ्यासाठी बसविलेल्या मोटारीचे स्टार्टरही चोरून नेले.
या धाडसी चोरीत, दहा शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे नुकसान झाले असून, तब्बल ३४५ फूट केबल चोरीला गेली. अंदाजे पाच लाख रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले.