पिंपरखेडमध्ये हॉटेल कामगारांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरखेडमध्ये हॉटेल कामगारांना मारहाण
पिंपरखेडमध्ये हॉटेल कामगारांना मारहाण

पिंपरखेडमध्ये हॉटेल कामगारांना मारहाण

sakal_logo
By

शिरूर, ता. १६ : हॉटेल बंद करून झोपलेल्या कामगारांनी दार वाजवूनही ते न उघडल्याने संतप्त झालेल्या दोघांनी मागील बाजूच्या कंपाउंडवरून हॉटेलमध्ये प्रवेश करून तिघा कामगारांना लोखंडी उलथण्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील साडेसात हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील पंचतळे परिसरात मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला.
भावेश संदीप भोईर या वेटरने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी आज कृष्णा गुंजाळ व प्रशांत शिरसाठ (पूर्ण नाव पत्ता नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भावेश याच्यासह आनंद सिंह व बंटी सिंह हे पंचतळे परिसरातील ‘हॉटेल विसावा’मध्ये कामाला असून, बुधवारी रात्री उशिरा हॉटेल बंद करून ते तिघेही हॉटेलमध्ये झोपले होते.
दरम्यान, एक वाजण्याच्या सुमारास कृष्णा गुंजाळ व प्रशांत शिरसाठ यांनी हॉटेलचे मेन गेट वाजविले, मात्र आतून कुठलाच प्रतिसाद न आल्याने त्यांनी हॉटेलच्या मागील बाजूच्या कंपाउंडवरून उडी मारून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आवाजाने भोईर याला जाग आली असता, ‘गेट वाजवले तरी उघडले का नाही?’ अशी विचारणा करीत त्यांनी तेथील लोखंडी उलथण्याने भोईर याला मारहाण केली. त्यातील एकाने खाली पाडून धरले; तर एकाने भोईर याच्या खिशातील साडेसात हजार रुपये काढून घेतले. भांडणाच्या आवाजाने आनंद सिंह व बंटी सिंह हे जागे झाले व ते भोईर याला सोडविण्यासाठी मधे पडले असता गुंजाळ व शिरसाठ यांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि साडेसात हजार रुपये घेऊन ते निघून गेले. जाताना त्यांनी हॉटेल मालक नीलेश पळसकर व व्यवस्थापक हरीश चारे यांच्या नावानेही शिव्या दिल्याचे भोईर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शिरूर पोलिसांनी कृष्णा गुंजाळ व प्रशांत शिरसाठ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.