शिरूरच्या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या दोन तरुणांचा
अपघातात जागीच मृत्यू
शिरूरच्या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू

शिरूरच्या दोन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू

sakal_logo
By

शिरूर, ता. १९ : भरधाव मद्यधुंद मोटारचालकाने दुचाकीला मागून ठोकरल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात शिरूरमधील दोघे तरुण दोन वाहनांमधे चिरडून जागीच ठार झाले. पुणे-नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ (ता. शिरूर) शनिवारी (ता. १८) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. नीलेश हैबती थिटे (वय २९) व शिवाजी अरुण जवळगे (वय २९, दोघेही रा. प्रीतम प्रकाश नगर, शिरूर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत थिटे यांचे मामा प्रताप बबनराव महाजन (रा. रेव्हेन्यू काॅलनी, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मोटारचालक विजय बाळासाहेब रानवडे (रा. कारेगाव, ता. शिरूर) याला अटक केली असून, शिरूर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश थिटे व शिवाजी जवळगे हे एकमेकांचे जिवलग मित्र असून, कुरिअर व इतर छोटी-मोठी कामे करीत होते. जवळगे याचे कुरिअरचे काम असल्याने शनिवारी सायंकाळी दोघे कारेगाव येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दुचाकीवरून शिरूरला घरी येत होते. दरम्यान न्हावरे फाट्याजवळील हॉटेल शिवनेरी समोर नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारीने (क्र. एमएच १२ एनयु ४९६५) त्यांच्या दुचाकीला मागील बाजूने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतुकीच्या कंटेनरवर आदळली. त्यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर, थिटे व जवळगे यांच्या मित्रमंडळींसह प्रीतम प्रकाश नगर मधील तरुणांची अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. विजय रानवडे या मद्यधुंद मोटार चालकाला पकडून तरूणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.