सोनेसांगवीत भक्तिमय वातावरणात वृक्षदिंडी
शिरूर, ता. २९ : डोईवर तुळशी, चला पंढरपुराशी... चल गं सखे चल गं सखे पंढरीला या भावगीतांच्या तालावर ठेका धरलेले बालवारकरी... सोबत विठ्ठल - विठ्ठल चा धावा आणि ज्ञानेश्वर माऊली - तुकारामांचा गजर... टाळमृदंगांची मधुर सुरावट... परिसरात फडकणारे भगवे ध्वज... निमित्त होते सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील शालेय विद्यार्थ्यांनी टाळ - चिपळ्यांच्या गजरात विठ्ठल - रुक्मिणीची मिरवणूक आणि सोबतीला ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे.
भक्तिमय, उत्साही व प्रसन्न वातावरणात निघालेल्या या बालवारकऱ्यांच्या निर्मलवारीत पालक आणि ग्रामस्थही नुकतेच सहभागी झाले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच रेखाताई काळे व माजी उपसरपंच मल्हारी काळे यांनी सपत्निक पालखीची पूजा केली. परशुराम डांगे, प्रमिला काळे, दीपाली शेळके हे ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या सन्मानानंतर, ''झाडे लावा, पर्यावरण वाचवा'', ''पाणी अडवा, पाणी जिरवा'' अशा घोषणा देत दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. दिंडीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी या निर्मलवारीवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण झाली. ग्रामदैवत श्री हनुमान महाराज मंदिरासमोर या सोहळ्यातील गोल रिंगण पार पडले. यात विठ्ठल - रुक्मिणी च्या वेशातील बालचमूंना मध्यभागी उभे करून त्यांच्याभोवीत फेर धरत उपस्थितांनी ठेका धरला.
विद्यार्थी, पालकांनी देहभान हरपून नृत्य
विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या अनेक विद्यार्थी व पालकांनी देहभान हरपून नृत्य केले. बालवारकऱ्यांबरोबरच पुरुष - महिला ग्रामस्थांनीही फेर धरला. यावेळी बालवारकऱ्यांना ग्रामस्थांनी न्याहारी म्हणून फराळाचे पदार्थ व फळांचे वाटप केले. मुख्याध्यापक अशोक धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रीमती तळोले यांनी आभार मानले.
वैष्णवांचे दैवत असलेल्या विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीला असंख्य वारकरी पंढरपूरला जात असताना विद्यार्थ्यांनाही वारीचे महात्म्य समजावे, त्यांनाही वारीची अनुभूती यावी आणि महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, सार्वजनिक स्वच्छता याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी या दिंडीसोहळ्याचे आयोजन केले.
- मल्हारी काळे, माजी उपसरपंच, सोनेसांगवी
02585
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

