शिरूर विधानसभेचा गुल''कंद’ कोण चाखणार?

शिरूर विधानसभेचा गुल''कंद’ कोण चाखणार?

शिरूर, ता. ३ : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचे पडसाद शिरूर तालुक्यात व प्रामुख्याने शिरूर-हवेली मतदार संघात उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय बंडात शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार हे सहभागी आहेत किंवा कसे, याबाबत त्यांची अधिकृत भूमिका अद्याप जाहीर न झाल्याने स्थानिक पदाधिकारीही संभ्रमात पडले आहेत. आमदार पवार यांचा पवित्रा निश्चीत झाल्याशिवाय तोंड न उघडण्याची भूमिका बहुतांश पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. ते शपथविधीवेळी अजित पवार यांच्यासमवेत दिसत होते. अजित पवार यांच्या यापूर्वीच्या पहाटेच्या शपथविधीवेळी ते होते. मात्र, त्यांनी ‘आम्ही पवारसाहेबांसोबत’ अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे सद्यःस्थितीतील त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तथापि, त्यांची अधिकृत भूमिका समजू शकली नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी सावध पवित्रा घेतला असून, बदलत्या राजकीय स्थितीवर तातडीने भूमिका जाहीर करण्यास नकार दिला.

सद्यःस्थितीत राष्ट्रवादीकडून अशोक पवार हेच फिक्स विधानसभेच्या रिंगणात असताना आणि जिल्हा बॅंकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्याकडे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात असताना राज्यस्तरीय घडामोडींमुळे सर्वच समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. अजित पवार यांचे कट्टर म्हणून अशोक पवार यांना ओळखले जाते. तथापि, त्यांच्या गतवेळच्या बंडात त्यांनी पवारसाहेबांच्या बाजूने जाणे पसंत केले होते. ते बंड खरे कि बनावट याबाबतचे चर्वितचर्वण अद्याप चालू असताना आताच्या बंडात मात्र त्यांनी सावध भूमिका घेतल्याने राजकारणाच्या पटलावर उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे.
विधानसभेच्या आखाड्यातील आमदार पवार यांचे प्रतिस्पर्धी म्हणून स्थान पक्के केलेल्या प्रदीप कंद यांचेही अजित पवार यांच्याशी सख्य असल्याच्या वावड्या अधून-मधून उमटतच असतात. त्यातूनच नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कंद यांनी विजयश्री खेचून आणताना बारामती तालुक्यातून मिळविलेली मते राजकीय विश्लेषक व जाणकारांचे डोळे विस्फारणारी ठरली.
आमदार पवार यांनी गेल्या बंडाच्या वेळी साथ सोडल्याचे शल्य अजित पवार यांच्या मनात ठासून भरल्याचे काही कार्यक्रमात त्यांनी आमदारांबाबत शेलक्या केलेल्या शाब्दिक अंगूलीनिर्देशातून स्पष्टपणे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे कधीही कंद यांना गळाला लावून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवतील, अशी भाकिते राजकीय पटलावर वर्तविली जातात.

भावकीला किती जुमानणार?
राज्यस्तरीय घडामोडींमुळे आता सारीच राजकीय गणिते बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूरला विधानसभेची आगामी निवडणूक राष्ट्रवादीच्याच दोन गटांत लढविली गेल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे अजित पवार हे भावकीला किती जुमानणार हा प्रश्न असून, त्यांच्या राजकीय प्रेमाचा गुल''कंद'' येणाऱ्या निवडणुकीत कुणाला चाखायला मिळणार, हे आगामी निवडणुकीत दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com