शिरूरमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

शिरूरमध्ये भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

शिरूर, ता. १३ : शहर व परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम नगर परिषदेने शुक्रवारपासून हाती घेतली. याकामी कोल्हापूर येथील ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ या संस्थेची नियुक्ती केली असून, मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २५ कुत्री पकडून त्यांची तपासणी केली.
शिरूर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. आयुष भास्कर हरिहर या घराच्या अंगणात खेळत असलेल्या बालकावर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना गुजर मळा परिसरात काही दिवसांपूर्वी घडल्यानंतर नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी महादेव नगर परिसरातील पवन स्वप्नील यादव (वय ८) या शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू झाल्याने परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत घबराटीचे वातावरण होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पक्ष, शिरूर प्रवासी संघ, बहुजन मुक्ती पार्टी व हुडको कॉलनी रहिवासी संघासह विविध संस्था-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आवाज उठविताना त्यांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी नगर परिषदेकडे केली होती.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे, पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख राजश्री मोरे, स्वच्छता समितीचे माजी सभापती विठ्ठल पवार, रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष नीलेश जाधव, सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेचे विजय पाटील, स्वच्छता विभागातील मनोज अहिरे, सागर कांबळे यांच्यासह मोहिमेतील सहभागी ११ कर्मचाऱ्यांनी सकाळी शहरातील कुत्र्यांचा जास्त उपद्रव असलेल्या भागाचा सर्वे केला. त्यानंतर गुजर मळा परिसरातून प्रत्यक्ष मोहिमेला सुरवात केली.
या मोहिमेअंतर्गत गुजरमळा, लाटेआळी व हलवाई चौक परिसरातून पहिल्याच दिवशी २५ कुत्री पकडल्याची माहिती बर्गे यांनी दिली. नगर परिषदेच्या बंद असलेल्या शाळा इमारतीतील एका खोलीत या कुत्र्यांना ठेवण्यात आले असून, निर्बिजीकरणानंतर दोन दिवस त्यांना पशुवैद्यकांच्या निगराणीखाली ठेवले जाईल व त्यानंतर सोडून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आयुष हरिहर या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होण्यापूर्वीच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची निविदा नगर परिषदेने काढली होती. निविदा मंजुरीची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यास सुरवात केल्याची माहिती मुख्याधिकारी काळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com