आपलेपणाने दुःखाकडे बघितल्यास जगण्याचे गाणे सूरमयी होते

आपलेपणाने दुःखाकडे बघितल्यास जगण्याचे गाणे सूरमयी होते

शिरूर, ता. १० : ‘‘जीवन आनंदाने जगायचे असेल तर सोडून द्यायला शिका. सकारात्मकतेने जगायला शिका. आपलेपणाने आपल्या दुःखाकडे बघायला शिकलो तरच जगण्याचं गाणे सूरमयी होईल. एकमेकांना सामावून घेता येते त्यालाच जगण्याचं गाणं करता येते. छान जगा, मस्त हसा कारण भाळावरील चंद्रकोरीपेक्षा गालावरील चंद्रकोर जास्त महत्त्वाची असते. जिद्दीने, प्रेमाने त्यागाने ज्याला जगता येते तो नकारात्मकतेवर मात करू शकतो. जगात वाईट असे काहीच नसते. तुमची दृष्टी विशाल दुर्बिणीसारखी ठेवा म्हणजे प्रत्येक बाबीची सुंदर नक्षी झाल्याशिवाय राहणार नाही.’’ अशा भावना वक्त्या अनघा मोडक यांनी व्यक्त केल्या.
नऊ वर्षांपूर्वी एका आजारपणात दृष्टी गमावूनही रेडिओ जॉकी, लेखिका, मुलाखतकार, सूत्रसंचालिका, गायिका, दक्ष पत्रकार आणि प्रेरक वक्त्या अनघा मोडक ‘रसिक विचार मंच’ने आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होत्या. निमित्त होते दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या ८५ व्या जयंतीचे. पंचायत भवनच्या सभागृहात झालेला कार्यक्रम ऐकण्यासाठी शिरूरकरांनी गर्दी केली होती. त्यात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
यावेळी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल आणि त्यांच्या पत्नी दिना धारिवाल यांनी रसिकलाल धारिवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी अभिवादन केले.
या सोहळ्याचे संयोजक संदीप बिहाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. सतीश धुमाळ यांनी प्रास्ताविकात रसिक विचार मंचच्या उपक्रमांचा आढावा घेतला. प्रा. अमोल शहा यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. क्रांती पैठणकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. किरण आंबेकर यांनी आभार मानले.

आपण एखाद्या दैवतेची पालखी उचलतो तेव्हा तिचे ओझे न वाटता एका जबाबदारीने मन प्रफुल्लित होते. तद्वतच दुःखाचे ओझे मानले तर आपण वाकणारच. दुःख उगाळत बसलो तर हाती दुःखच लागेल. समस्या या जीवनाची परीक्षा बघायला आलेल्या असतात. त्यांना संयमाने आणि धैर्याने सामोरे जा.
अनघा मोडक, मोटीव्हेशनल स्पीकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com