अनास्थेच्या कारंजातील तुषारांत नागरिक ''चिंब''

अनास्थेच्या कारंजातील तुषारांत नागरिक ''चिंब''

नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. २८ : शिरूर शहरातील लाटेआळीतील पै. शेख गुलामनबी बालोद्यानाची देखभाल व दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. खेळणी तुटली असून, पाण्याअभावी हिरवळ जळून सर्वत्र पालापाचोळा व कचरा पसरलेला आहे. कारंजे बंद पडले असून, त्याच्या मोटारी व विद्युत खांब देखील चोरीला गेले आहेत. स्वीमिंग पूल कोरडा पडला आहे. नगरपरिषदेच्या अनास्थेमुळे उद्यान बंद आहे. यामुळे उन्हाळ्यात खेळायचे कोठे हा प्रश्‍न मुलांना व त्यांच्या पालकांना सतावत आहे.


उद्यानात पाण्यासाठी टाकी धूळ खात पडली आहे. या उद्यानातील झाडाझुडपांना पाण्यासाठी म्हणून बोअर घेण्यात आला होता. परंतु त्यात मोटार अडकल्यानंतर तो बंद पडला. उद्यानात ३५ पोल होते. त्यापैकी आता केवळ दोन शिल्लक राहिले आहेत..
लाटेआळी परिसरातील नागरिक व विशेषतः मुलांसाठी उभारलेल्या बालोउद्यानास सुरुवातीस चांगला प्रतिसाद होता. परंतु देखभाल व दुरुस्तीअभावी एकेक वस्तू चोरीला गेली आणि उद्यानाची दुरवस्था झाल्याचे स्थानिकांना सांगितले.


विरंगुळ्यासाठी येणाऱ्यांची कुचंबणा
शिरूरमधील दुसऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा मुळातच अपुरी आहे. उद्यानात मध्यवर्ती भागात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व त्यावर मेघडंबरी असून, एका बाजूला आंबेडकर भवन व ग्रंथालय तर त्याशेजारी कायमस्वरूपी स्टेज बांधण्यात आलेले आहे. शिवाय पुढील बाजूस नगर परिषदेचा आरओ प्लांट आहे. त्यामुळे मुळातच अपुऱ्या जागेतील या उद्यानात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांमुळे व विविध सामाजिक उपक्रमांमुळे हे उद्यान कायम गजबजलेले असते. त्यामुळे विरंगुळ्यासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होते.


शेख गुलामनबी बालोद्यानाची गेल्या दहा-बारा वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अनेकदा फोटो काढून नगर परिषद प्रशासनाला दाखविले. परंतु कुठलीही दखल घेतली नाही. नगर परिषदेने हे उद्यान ताब्यात दिल्यास ते परत पूर्वीसारखे करून देण्याची भाईजान यांची तयारी आहे. त्यासाठी नगर परिषदेशी पत्रव्यवहार केला आहे.
- नसीम खान, माजी नगराध्यक्ष, शिरूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा अपुरी असली तरी गैरसोय कुठलीही नाही. झाडांसाठी पाणी, वीज आणि दैनंदिन स्वच्छतेबरोबर वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती केली जाते. सुधारणांची कामेदेखील प्रगतिपथावर असून, इतर कामेदेखील नगर परिषद व समितीच्या समन्वयातून केली जातात. उद्यान विस्तारासाठी पाठपुरावा चालू आहे.
विनोद भालेराव, अध्यक्ष, जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती, शिरूर

शहरातील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका बाळासाहेब दरेकर यांच्याकडे दिलेला असून, जिजामाता व डॉ. आंबेडकर उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी प्रत्येकी तीन लाख रुपयांची तरतूद नगर परिषदेकडून केली जाते. त्यातून ही दोन्ही उद्याने सुस्थितीत आहेत. गुलामनबी बालोद्यानाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार केला असून, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल.
- डी. टी. बर्गे, स्वच्छता निरीक्षक, शिरूर नगर परिषद


03695

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com