‘शिरूर’मधील २,५०९ केंद्रांवर तयारी पूर्ण

‘शिरूर’मधील २,५०९ केंद्रांवर तयारी पूर्ण

शिरूर, ता. १२ : अठराव्या लोकसभेसाठी, शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्या (ता. १३) मतदान होत आहे. मतदान शांततेत व अडथळ्यांविना पार पडावे, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात मतदानासाठी दोन हजार ५०९ मतदान केंद्रांची व्यवस्था केली असून, शिरूर विधानसभा मतदारसंघात ४३९ ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवार निवडणूक लढवित असून, शिरूर मतदारसंघाच्या इतिहासातील ही आजवरची सर्वाधिक उमेदवार संख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी या मोठ्या पक्षांसह लोक सेना पार्टी, बळिराजा पार्टी, सैनिक समाज पार्टी, भारतीय जवान किसान पार्टी, भारत आदिवासी पार्टी, भारतीय नवजवान सेना पक्ष, भीम सेना व भारतीय लोकविकास पार्टी या पक्ष - पार्ट्यांसह आठ अपक्षही आपले नशिब अजमावत आहेत.
मतदारसंघ पूनर्रचनेत सन २००८ मध्ये अस्तित्वात आलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात शिरूरसह आंबेगाव, खेड, जुन्नर, हडपसर व भोसरी या विधानसभा मतदार संघांचा समावेश असून, जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे २५ लाख ३९ हजार ७०२ इतकी या मतदार संघाची मतदार संख्या असून, यामध्ये १३ लाख ३६ हजार ८२० पुरुष तर १२ लाख दोन हजार ६७९ महिला मतदार आहेत. २०३ तृतीयपंथी मतदारांचाही या मतदारसंघात समावेश आहे. विक्रमी उमेदवारांबरोबर विक्रमी मतदार संख्येमुळे हा मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेत आला आहे.

लोकसभा मतदार संघातील मतदार संख्येवर दृष्टीक्षेप टाकला असता सर्वाधिक पाच लाख ८१ हजार ९०४ एवढी हडपसर मतदार संघाची मतदार संख्या असून, सर्वात कमी म्हणजे तीन लाख दोन हजार १०१ एवढे मतदार आंबेगाव मतदार संघात आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघात पाच लाख ५१ हजार ५८२ तर त्याखालोखाल चार लाख ३९ हजार २७६ इतके मतदार शिरूर विधानसभा मतदार संघात आहेत. जुन्नर विधानसभा मतदार संघात तीन लाख १२ हजार २०५ तर खेड मध्ये तीन लाख ५२ हजार ६३४ मतदार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी ११ हजार ५८६ अधिकारी तैनात
मतदान प्रक्रियेसाठी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून, मतदान प्रक्रियेसाठी ११ हजार ५८६ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे हे पथक मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्यासह आजच मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना झाले आहे. केंद्राच्या ठिकाणी आवश्यक तो पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे. मतदानाच्या

प्रशासनाकडून या सुविधांची पूर्तता
- मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,
- दिव्यांगांसाठी रॅम्प, सुरक्षा व्यवस्था,
- न्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे,
- पाच पेक्षा अधिक मतदार केंद्र असलेल्या बैठक व्यवस्था,
- उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी

शिरूर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही केली आहे. मतदारांनी मतदानाला येताना आपले मतदार ओळखपत्र किंवा आधारकार्ड, रेशनकार्ड व ओळख पटेल असा पुरावा सोबत ठेवावा. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे.
- अजय मोरे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ,शिरूर लोकसभा मतदार संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com