दुपारी चार नंतर रांगा

दुपारी चार नंतर रांगा

शिरूर, ता. १३ : लोकसभा निवडणूकीसाठी, शिरूर शहर आणि तालुक्यात आज मतदानाचा उत्साह होता. काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती, त्यामुळे मतदारांत उत्साह होता. तरुणाई उन्हाला न जुमानता मतदानासाठी जल्लोषात दाखल झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर दुपारी चार नंतर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. दरम्यान, सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावल्याने आणि जोर बऱ्यापैकी असल्याने लोक घराबाहेर पडले नाहीत, त्याचा मतदानावर परिणाम झाला.
शिरूर लोकसभा मतदार संघासाठी एकूण ४३९ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. एकूण ३२ उमेदवारांसह नोटा अशी ३३ नावे असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर तीन बॅलेट युनिट ठेवण्यात आले होते. त्यामुळे अशिक्षित मतदारांसह नवमतदारांचाही काहीसा संभ्रम होत होता. तरीही बहुतांश ठिकाणी काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. विद्याधाम प्रशाला या शहरातील मतदान केंद्रावर काही तांत्रिक कारणामुळे सकाळी ११ च्या सुमारास मतदान यंत्र बंद पडले. मात्र, पंधरा मिनीटांनी मतदान सुरळीतपणे सुरू झाले.
शिरूर शहरासह रांजणगाव गणपती, कारेगाव, कर्डे येथे मतदारांचा विशेष उत्साह जाणवला. गोलेगाव, तर्डोबाची वाडी येथे दुपारी तर मतदान केंद्रे अक्षरशः ओस पडली होती. दुपारी एक पर्यंत कारेगाव मध्ये ३५ टक्के मतदान झाले. उन्हाची तीव्रता असूनही रांजणगावच्या मतदान केंद्राबाहेर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी ठाण मांडून बसले होते. करडे येथे ९७ वर्षीय लिंबाजी दगडू जगदाळे यांनी पत्नीसह येऊन मतदान केले. गोलेगावात दुपारी तीनपर्यंत अवघे ३२ टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्रातही शुकशुकाट जाणवत होता. पाच वाजेपर्यंत शिरूर मतदार संघात सरासरी ४२ टक्के मतदान झाले होते. सव्वापाचच्या सुमारास शिरूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. काही प्रमाणात गाराही पडल्या. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांची त्रेधा उडाली. मतदार मात्र आतील बाजूस असल्याने ते पावसात भिजण्यापासून वाचले. जवळपास मतदानाची वेळ संपेपर्यंत पाऊस चालू होता.

हरित मतदान केंद्र लक्षवेधी...
मतदार जागृती अभियानांतर्गत शहरातील सेंटर शाळा केंद्राला हरित मतदान केंद्राचे स्वरूप दिले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते वर्गखोल्यांपर्यंत हिरव्या रंगाचा, ज्यूटचे छत टाकले होते. तर जमिनीवर सर्वत्र हिरव्या रंगाच्या चटया टाकल्या होत्या. या मार्गाच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या व संपूर्ण परिसर नारळाच्या झावळ्यांनी सुशोभित केला होता. शाळेच्या व्हरांड्यात, प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या, तुळस असलेल्या कुंड्या ठेवल्या होत्या. पर्यावरण जनजागृतीसाठी ठिकठिकाणी फलक लावले होते. तर फुलपाखरू, झावळ्यांनी लगडलेली झोपडी उभारून तेथेच कल्पकतेने सेल्फी पॉइंट केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com