महागणपतीचा शाही विवाह उत्साहात

महागणपतीचा शाही विवाह उत्साहात

शिरूर, ता. ८ : रंगीबेरंगी व सुगंधित फुलमाळांनी सजलेला मंदिर परिसर... केळीचे खुंट लावून सजविलेले प्रवेशद्वार... गुढ्या-पताका, फुलमाळा आणि तोरणांनी सजविलेला परिसर... मंदिराच्या प्रांगणात उभारलेला मंडप... भरजरी वस्त्रांनी सजलेल्या उत्सवमूर्ती... यथासांग पुजेबरोबरच मंत्रघोषांसोबत मंगलाष्टकांचे सुमधुर स्वर... गणेशभक्तांकडून फुलांच्या पाकळ्यांबरोबरच अक्षदांची उधळण... असे चित्र होते आज रांजणगाव गणपती (ता. शिरूर) च्या महागणपती मंदिरात. शनिवारी (ता. ८) शेकडो वऱ्हाडींच्या उपस्थितीत महागणपतीचा गोरज मुहूर्तावर शाही विवाह सोहळा थाटामाटात झाला.
सिंदूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाच्या कन्या रिद्धी आणि सिद्धी ला बंदीस्त केले होते. महागणपतीने त्यांची सुटका केल्यानंतर ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून त्या दोघींशी महागणपतीने विवाह केल्याची आख्यायिका गणेश पुराणात आहे. त्यानुसार महागणपतीचा हा विवाह सोहळा साजरा केला जातो. या विवाह सोहळ्यानिमित्त २ जून ते दहा जून दरम्यान, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने रांजणगाव महागणपती मंदिरात विविध विधी आणि सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री गणेश प्रताप ग्रंथ पारायण व श्री गणेश अथर्वशीर्ष प्रवचन सप्ताह या कालावधीत करण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली.
महागणपती मंदिरातील मूर्तीची महापूजा झाल्यानंतर दिवाणखान्यातील उत्सवमूर्तीला वाजत-गाजत मंडपात आणले. मुख्य गाभाऱ्यातील रिद्धी-सिद्धीचीही पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. मंडपातील पाटावर या उत्सवमूर्ती प्रतिष्ठापित केल्यानंतर त्यांना भरजरी वस्त्र परिधान करण्यात आले. रंगीबेरंगी फुलांचे हार अर्पण केल्यानंतर मंगलाष्टकांनी विवाह सोहळा संपन्न झाला. देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांनी सपत्निक पूजा केली. हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावून अक्षदा व फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. यावेळी विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड महाराज यांचे गणेश अथर्वशीर्ष प्रवचन झाले. देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर यांच्यासह रांजणगाव पंचक्रोशीतून ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने विवाह सोहळ्याची सांगता झाली.
एकादशीपासून सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता आज हभप रोहिणी परांजपे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर पंचक्रोशीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. याच सोहळ्यांतर्गत सोमवारी (ता. १०) हभप चारुदत्त महाराज आफळे यांचे कीर्तन होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com