ॲसिडसदृश्‍य रसायन सोडल्याने लाखो लिटर पाणी दूषित

ॲसिडसदृश्‍य रसायन सोडल्याने लाखो लिटर पाणी दूषित

Published on

शिरूर, ता. ११ : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथील कामिनी ओढ्यात अज्ञात व्यक्तींनी बुधवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास ॲसिडसदृश्‍य रसायन आणून सोडल्याने लाखो लिटर पाणी दूषित झाले. यामुळे ओढ्यातील मासे व जलचर मृत्युमुखी पडले आहेत. हेच पाणी पुढे कोंढापुरीच्या साठवण तलावात जात असून शिक्रापूर, रांजणगाव गणपतीसह कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे येथील पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत या तलावातूनच असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सावधानतेचा इशारा देत काही दिवस हे पाणी न वापरण्याचे आवाहन परिसरातील गावांना केले आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळेस हे ॲसिड ओढ्याच्या पाण्यात टाकणाऱ्यांनी घातपाताचा प्रयत्न केल्याचा संशय असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी गणेगाव ग्रामपंचायतीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे.
टॅंकरमधून हे ॲसिडसदृश्‍य रसायन रात्रीच्या सुमारास ओढ्याच्या पाण्यात सोडून दिल्याची स्थानिकांची माहिती असून, आज ओढ्यातील पाण्याचा रंग अचानक बदलल्याने व परिसरात उग्र दर्प पसरल्याने खळबळ उडाली. याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. कामिनी ओढ्यावर पुलाचे बांधकाम चालू असून, पाण्याला उग्र दर्प येत असल्याचे व पाण्यावर तेलकट तवंग आल्याचे गणेगाव चे पोलिस पाटील श्रीकांत झांजे यांनी गणेगाव प्राथमिक केंद्रातील आरोग्य सेविका राधिका उत्तम नरगिडे यांना कळविले. त्यांनी आरोग्य पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत ओढ्यातील पाण्याची तपासणी केली. ओढ्यात ज्या ठिकाणी हे ॲसिड सोडले होते त्या ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही बाजूचे गवत काळे पडून जळून गेल्याचे व मेलेच्या माशांचा खच पडल्याचे दिसून आले.

पाण्यावर लाखो लोक अवलंबून
ओढ्यातील पाण्यावर गणेगाव ची पाणीपुरवठा योजना असून, ओढा पुढे कोंढापुरी जलसाठवण तलावाला मिळतो. तेथे शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कोंढापुरी या मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत असून, परिसरातील अनेक गावांच्या शेतीसिंचन योजना आहेत. या पाण्यावर लाखो लोक अवलंबून आहेत.

गणेगाव खालसा च्या सरपंच मंदा ढसाळ, रांजणगावचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, गणेगाव चे पोलिस पाटील झांजे, वाघाळेचे माजी उपसरपंच राजेंद्र भोसले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, ब्रह्मानंद पोवार यांनी घटनास्थळी भेट दिली. गणेगाव खालसा ग्रामपंचायतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली व हा खोडसाळपणा करणारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. जेसीबी ने ओढ्याजवळ खड्डा घेऊन त्यात हे पाणी उचलण्याबाबत आणि हे दूषित पाणी पुढे जाणार नाही याबाबत ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.


कामिनी ओढ्यातील पाण्याची प्राथमिक तपासणी केली असून, या पाण्यात नायट्रिक ॲसिड आढळले आहे. त्यामुळे हे पाणी पुढील काही दिवस पिण्यास, आंघोळीस, जनावरांना पाजण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी वापरू नये. जनावरांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये.
-राधिका उत्तम नरगिडे, आरोग्य सेविका, गणेगाव

कामिनी ओढ्यातील पाण्यात सोडलेल्या ॲसिड मुळे गणेगाव, रांजणगाव, शिक्रापूर येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका होऊ शकतो. ओढ्यामध्ये हे घातक रसायन सोडून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई करावी.
- नंदा गौतम ढसाळ, सरपंच, गणेगाव खालसा, ता.शिरूर


03907

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.