

शिरूर, ता. १७ : शिरूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर यांनी आज सूत्रे स्वीकारली. येथील तहसीलदार कार्यालयात निवडणूक कार्यालय स्थापण्यात आले असून, विधानसभा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
निवडणूक आयोगाने काल विधानसभा निवडणूक जाहीर केल्याने या निवडणुकीची आचारसंहिता कालपासूनच लागू झाली आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राजापूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यावेळी उपस्थित होते. शिरूर व हवेली तालुक्यातील गावे मिळून हा मतदार संघ तयार झाला असून, या विधानसभा निवडणूकीसाठी शिरूर तालुक्यातून एकूण दोन लाख ११ हजार ४०९ मतदार आहेत. त्यात एक लाख सात हजार २४७ पुरुष तर एक लाख चार हजार २५२ एवढ्या महिला मतदार आहेत. इतर दहा मतदार आहेत. हवेली तालुक्यातून एक लाख ३१ हजार ६२७ पुरुष व एक लाख १६ हजार ५९१ महिला व इतर १३ मिळून दोन लाख ४८ हजार २३१ मतदार आहेत. या मतदार संघाची एकूण मतदार संख्या चार लाख ५९ हजार ६९३ इतकी असून, नवीन मतदार नोंदणी चालू असल्याने त्यामध्ये वाढ होऊ शकते असे राजापूरकर यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी ४५७ मतदान केंद्र असतील. आदर्श आचारसंहिता पालनासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून, निवडणूक काळात नऊ भरारी पथकांमार्फत तालुक्यातील संपूर्ण हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. ही पथके २४ तास कार्यरत असतील. नेते, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी आचारसंहितेचे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, त्यासाठी येथील तहसीलदार यांच्या दालनात खास कक्ष उभारण्यात आला आहे. शिरूर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षांवरील ५४९० मतदार असून, ३५४६ दिव्यांग मतदार आहेत. आर्मीच्या सेवेत असणारे ४०३ मतदार असून, शासकीय सेवेतील मतदानाची नोंद अद्याप चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.