पिंपरी दुमाला येथे सोमेश्वरासह रामेश्वराच्या दर्शनाची पर्वणी

पिंपरी दुमाला येथे सोमेश्वरासह रामेश्वराच्या दर्शनाची पर्वणी

Published on

नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर : पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे सोमेश्वरासह रामेश्वराच्या देवालय एकाच गावात असा दुर्मीळ योग पाहावयास मिळतो. दोन्ही देवालये शेजारी - शेजारी असल्याने एकाच वेळी दोन स्वयंभू शिवलिंगांचे दर्शन घेण्याची पर्वणी साधता येते. दर्शनाबरोबरच; अजिंठा-वेरूळ येथील शिल्पांशी साधर्म्य साधणाऱ्या शिल्पसमृद्ध अशा सोमेश्वर मंदिराच्या शिखराचा जीर्ण झालेला भाग काढून तेथे भीमाशंकर येथील मंदिराच्या शिखराप्रमाणे प्रतिकृती साकारल्याने पुरातन मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली आहे.
गावाच्या अग्रभागीच हेमाडपंथी शैलीतील ही प्राचीन मंदिरे असून, ती यादवकालीन वा पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. ‘गणेश पुराण’ या ग्रंथात या भूमीज मंदिरांचा उल्लेख आहे. सोमेश्वर मंदिराच्या बाजूला तर रामेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस पुष्करणी असून, खोलवर बांधून काढलेल्या या पुष्करीणींमध्ये कायमस्वरूपी पाणी असते व त्या मंदिरांच्या निसर्गसौंदर्यात मोलाची भर घालतात. रामेश्वर मंदिराच्या सभोवताली जिर्णोद्धार कामांतर्गत तटबंदी व फरसबंदी केली आहे. सोमेश्वर मंदिरावर नवा शिखर उभारल्याने काही जुन्या, दुर्मीळ मूर्ती अस्तंगत पावल्या असल्या तरी मंदिराच्या भिंतींवर व छतावर १५० हून अधिक छोट्या- मोठ्या मूर्ती, भित्तीचित्र व दगडी शिल्प पाहावयास मिळतात.
श्रावण महिन्यात शिवभक्तांची गर्दी होते. त्यात उत्तर प्रदेशातील भाविक आवर्जून येतात. महाशिवरात्रीला या देवस्थानची यात्रा भरते, पिंपरी दुमाला चे ग्रामस्थ व देवस्थान चे विश्वस्त या यात्रेचे नियोजन करतात.


सोमेश्वर मंदिराच्या पुढील भागात नंदीमंडप तर आवारात यज्ञवराह (विष्णू अवतार) व मत्स्याची वा कासवाची दगडी मूर्ती आहे. मंदिराच्या भिंती दगडी असून, असंख्य शिल्पांनी त्या अच्छादलेल्या आहेत. मुख्य मंदिराचा सभामंडप नक्षीदार दगडी खांबांवर उभारलेला आहे.

सोमेश्वर मंदिराच्या चहुबाजूच्या भिंतींवर ब्रह्मा, विष्णू, महेशासह श्री गणेश, श्रीकृष्ण, भैरव, चामुंडामाता, गोमटेश्वर, महावीर किंवा जैन स्वामी, नटराज या देवता ऋषी, तपस्वी, नाग, हत्ती आणि वादक, सुरसुंदरी व नर्तिकांच्या शिल्पांचा समावेश आहे. प्रवेशद्वारावर द्वारपालांसह दोन्ही बाजूला नक्षीदार प्रभावळीत शंख, चक्र, गदा ही आयुधे कोरलेली आहेत. गर्भगृहात तप करणारे ऋषी, जागोजागी भिंतीत चिणलेल्या वीरगळ, शुभचिन्हे, मातृशक्तीची प्रतिके, दर्पण सुंदरी, कावड घेतलेला पुरुष, घंटानाद करणारा भाविक, गळ्यात विंचू नरमुंडमाला, अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकटलेला चेहरा अशा आगळ्या - वेगळ्या शिल्पांबरोबरच वेताळगण, सुरसूंदरी, विषकन्या, पुत्रवल्लभा, किर्तीमुखे, वाली, सुग्रीव ही शिल्पे आणि शिल्पपट्टीकाही लक्ष वेधून घेतात.

कसे जाल?
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथून पिंपरी दुमाला कडे रस्ता जातो. पुण्याहून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर रांजणगाव असून, तेथून डावीकडे पिंपरीला जाण्यासाठी फाटा आहे. रस्त्यात छोट्या वाड्या-वस्त्या असून, फाट्यापासून साधारणतः सात किलोमीटरवर गाव आहे. शिरूरहून २५ किलोमीटर अंतर असून, रांजणगाव येथे उतरून खासगी वाहनाने जाता येते. एसटी व पीएमपीएमल बस ची दर तासाला सुविधा आहे.

परीसरातील पर्यटन स्थळे
पिंपरी दुमाला येथे सोमेश्वर व रामेश्वर मंदिर
रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिर
पाच किलोमीटरवर चिंचोली मोराची येथे चिंचवन हे मोरांचे वसतिस्थान
दिवंगत आमदार बाबूराव दौंडकर स्मारक
पाबळ : मस्तानीची कबर (३१ किलोमीटर)
टाकळी हाजी - निघोज : राजणखळगे (२४ किलोमीटर)
कवठे येमाई- श्री येमाई देवी मंदिर (२१ किलोमीटर)


सोमेश्वर मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. या पुरातन

मंदिराच्या भिंतींवर व शिखरावर असंख्य शिल्पे होती. शिखराचा भाग जुना झाल्याने त्यावरील भग्नावस्थेतील शिल्पांची विटंबना होऊ नये, या हेतूने मूळ मंदिराचा ढाचा न बदलता जुने शिखर उतरवून तेथे भीमाशंकर मंदिराच्या धर्तीवर नवीन शिखर साकारले आहे. गतवर्षीच हे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले असून, या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा चालू आहे.
-अभिषेक शेळके, अध्यक्ष, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, पिंपरी दुमाला, ता. शिरूर.

05444, 05443

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com