समुपदेशनातून अनेकांनी बदलला शेवटचा निर्णय

समुपदेशनातून अनेकांनी बदलला शेवटचा निर्णय

Published on

लोगो- ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन’

नितीन बारवकर : सकाळ वृत्तसेवा
शिरूर, ता. ९ : आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपविणारांची संख्या वाढत असताना या सामाजिक समस्येवर मात करून अनेकांना जीवनाची नवी दिशा आणि नव्याने जगण्याचा मार्ग दाखविणारे अनेक ‘मसिहा’ देखील कर्तव्यभावनेतून कार्यरत आहेत. जीवनाची इतिकर्तव्ये, मानवी जन्माचे महत्त्व आणि योग्य मार्गदर्शन व समुपदेशनातून या समस्येवर यशस्वी मात होताना दिसत आहे.
आत्महत्येच्या दारातून परत आलेले आणि आपल्या कार्याने अनेकांचा आधार व आदराचे स्थान बनलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अनाथांची माय (स्व.) सिंधूताई सपकाळ यांच्याकडून प्रेरणा घेत शिरूर शहरात ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या संवादिनी गटाच्या प्रमुख डॉ. सोनाली हार्दे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका बी. के. अर्चना बहेनजी, सहसंचालिक बी. के. शकुंतला बहेनजी, पुणे जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या शोभना पाचंगे पाटील, वात्सल्यसिंधू च्या उषाताई वाखारे, मनशांती छात्रालयाचे संचालक विनय सिंधूताई सपकाळ, आकांक्षा स्पेशल चाइल्ड संस्थेच्या राणीताई चोरे, बाबाजी महाराज चाळक, कल्पक शिक्षक महेश इंगळे यांच्यासह अनेक आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन व मार्गदर्शन केले जात आहे.
सन २०००ला शिरूर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे सेंटर सुरू झाले. अनेक पीडित, वंचित आणि दुःखी महिलांना या विद्यालयामार्फत नव्याने जगण्याची प्रेरणा मिळाली. अर्चना बहेनजी व शकुंतला बहेनजी या दररोज ‘मुरली’ या प्रवचनाच्या माध्यमातून जीवनातील आव्हाने, त्यावर संयमाने करावयाच्या उपाययोजना, जीवनाची इतिकर्तव्य यावर अखंड मार्गदर्शन करीत असतात. दुःखित, वंचित महिलांना त्या वैयक्तिक मार्गदर्शनही करीत असतात.
डॉ. सोनाली हार्दे व डॉ. नवनाथ हार्दे हे दांपत्य आपल्या रूग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांचे समुपदेशन करतात. त्यांच्या नातेवाइकांना जीवनातील समस्यांबाबत विनामूल्य मार्गदर्शन करतात. संवादिनी प्रज्ञामानसच्या माध्यमातून तणावग्रस्त, नैराश्यग्रस्त, वैफल्यग्रस्त तरुण, तरुणींना, महिलांना मार्गदर्शन करीत असतात. डॉ. सोनाली हार्दे यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले असून, शहराच्या आसपासच्या वाडी वस्तीवर जाऊन विविध खेळ, छोटे- मोठे उपक्रम, हास्य, योगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. या उपक्रमांतूनच महिलेचे अंतर्मन आमच्यासमोर खुले होते व त्यातून तीच्या मनाची घालमेल कळून तीला योग्य ते मार्गदर्शन करता येते, असे त्या म्हणाल्या. आत्महत्येच्या मार्गावरील अनेक महिलांनाही परावृत्त करता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

निमोण्यात थांबल्या आत्महत्या
तालुक्यातील निमोणेजवळील पिंपळाची वाडी येथे सन २०१६- १७ मध्ये १५ आत्महत्या झाल्या होत्या. यात शेतकरी, कामगार, मजुरांसह महिलांनी विविध किरकोळ कारणांनी मृत्यूला कवटाळले होते. याबाबत ग्रामस्थांनी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली. आध्यात्मिक, सामाजिक व्यक्तींसह शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखिले यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेत दिलासा दिला. ग्रामस्थांना एकत्र करून, त्यांना विश्वासात घेऊन आधार दिला. गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू करून त्यातून जीवनविषयक संदेश दिल्यानंतर आत्महत्यांचे सत्र थांबले. आता ग्रामस्थांमध्ये जगण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली असून, गेल्या पाच वर्षांत वाडीत व परिसरात एकही आत्महत्या झाली नसल्याचे माजी सरपंच विजय भोस यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com