रांजणगाव परिसरातील सुविधांबाबत नियोजन
शिरूर, ता. २३ : शिरूर तालुक्यातील रांजणगाव पंचतारीकीत एमआयडीसीमुळे वाढलेला तरंगत्या लोकसंख्येचा ताण आणि त्या तुलनेत स्थानिक ग्रामपंचायतींवर येणारा नागरी सुविधा पुरविण्याबाबतचा भार या पार्श्वभूमीवर रांजणगाव गणपतीसह कारेगाव व ढोकसांगवी या गावांमधील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांतर्गत या गावांमध्ये भरीव विकासकामांचे नियोजन शासन स्तरावर केले असून, या कामांसाठी निधीची उपलब्धता करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी, हिवरे ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत करावयाच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध विकासकामांचे नियोजन केले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, एमआयडीसीचे सहव्यवस्थापक डॉ. कुणाल खेमनार, तसेच स्थानिक प्रतिनिधी म्हणून आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, उद्योजक शुभम नवले, विश्वास कोहकडे, संदीप नवले आदी या बैठकीस उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे दृकश्राव्य माध्यमाद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, या विषयांवरील अडचणी मांडल्या. लोकसंख्येच्या फुगवट्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत आहे. या प्रश्नांवरच या बैठकीत विशेष चर्चा झाली. या समस्यांचा आढावा घेतानाच या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न आणि नागरी समस्या सोडविण्यासह गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, एमआयडीसीने या भागात विकासकामे करताना जिल्हा परिषदेशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.