रांजणगावात ‘लोकेश’च्या कामगारांचे आंदोलन
शिरूर, ता. २९ : रांजणगाव एमआयडीसीतील ‘लोकेश मशिन्स लिमिटेड’ या कंपनीतील २५ कामगारांनी, कंपनी प्रशासनाने एकतर्फी कामावरून कमी केल्याचा आरोप केला असून, गेले सात महिने पाठपुराव करूनही परत कामावर घेतले जात नसल्याने कुटूंबियांसह सोमवारपासून (ता. २९) कंपनीसमोर धरणे धरले आहेत.
मोटारींचे सुटे भाग बनविणाऱ्या लोकेश मशिन्स लिमिटेड या कंपनीतील दीपक तळेकर, संतोष चौरे, शितल सराफ व बाळासाहेब हजारे या कामगारांच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर सुरू झालेल्या या आंदोलनात पिडीत कामगार व त्यांचे कुटूंबिय सहभागी झाले आहेत. आंदोलनाबाबत तळेकर यांनी सांगितले की, गेले काही वर्षे कामगारांना वेतनवाढ न मिळाल्याने सन २०२४ ला आम्ही आमच्या शिवगर्जना कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. त्याचा राग मनात धरून आमच्यासोबत काम करणाऱ्या प्रदीप लांडे, महेश साळवे, रोशन कुमार राय व योगेश झुणझूणवार या कायम कामगारांची हैद्राबाद प्रकल्पात बदली केली. याबाबत आम्ही विचारणा केली असता आम्हा २५ कायम कामगारांना फेब्रुवारी २०२५ला फक्त मोबाईलवर संदेश पाठवून कामावरून कमी केले.
गेले सात महिने याबाबत सनदशीर मार्गाने मागणी करूनही कंपनी प्रशासन दाद देत नसल्याचा आरोप हजारे यांनी केला. कंपनीत आता कुठलेही काम शिल्लक नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, कंपनीचे नाव बदलून आता महागणपती फोर्जिंग ॲण्ड मशिन प्रा. लि. असे केले असून, पन्नास कंत्राटी कामगार भरून कंपनीत काम केले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला. आम्हाला काहीही कल्पना न देता कंपनीकडून आमच्या खात्यात वेगवेगळी रक्कम देखील जमा केली असल्याचे या कामगारांनी सांगितले. कामगार आयुक्तांसमोर आम्ही आमची व्यथा मांडली असून, दाद मागितली आहे. आम्ही वेळोवेळी कामगार आयुक्त कार्यालयात जातो, मात्र कंपनी प्रशासनाकडून कुणीही येत नाही अगर कंपनीची बाजू मांडत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आम्ही कंपनीचे कायम कामगार असून, आम्ही आमच्या कामात कुठलीही चूक केलेली नाही. त्यामुळे आम्हाला पूर्ववत कामावर घेईपर्यंत आम्ही कुटूंबियांसह कंपनीसमोरच बसू असा निर्धार या कामगारांनी व त्यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केला.
याबाबत कंपनीचे एचआर इरफान जमादार यांच्याशी संपर्क साधला असता, कंपनीची बाजू सांगतो, असे ते म्हणाले. परंतु नंतर संपर्क साधूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.