नंदीबैलाची घंटा अन् घुंगरांचा घुमतोय झंकार
शिरूर, ता. २१ : पाठीवर रंगीबेरंगी कापडांची मखमली झूल, गळ्यात कवड्यांची माळ व घुंगूरमाळा, बाकदार शिंगांवर मोरपिसाचे तुरे आणि मधोमध किणकिणणाऱ्या छोट्या घंट्या... पायात चाळ, कपाळावर छोटे आरसे अन् लाल-निळ्या मन्यांनी गुंफलेले बाशिंग... दिवाळीच्या पावन पर्वात ‘सोळा शिणगार’ केलेला नंदीबैल ढोलाच्या गुबूगुबू तालावर शिरूरमधील पेठेतून गळ्यातील घंटा आणि पायातील घुंगरांचा झंकार करीत ऐटीत फिरताना आपले नृत्यकौशल्य, बुद्धिचातुर्य दाखवीत वाहवा मिळवत आहे.
बालगोपाळांचे विशेष आकर्षण ठरलेल्या आणि ऐन दिवाळीच्या मंगलमय व उत्साही वातावरणात आपल्या दारात आलेल्या तब्बल सहा फूट उंचीच्या नंदीबैलाचे सुवासिनींनी, महिला भगिनींनी ठिकठिकाणी भक्तीभावाने पूजन करताना त्याला मायेने डाळ-गूळ, पीठ, धान्य, हिरवा चारा खाऊ घातला. दिवाळीत नंदीबैलवाले आपापल्या नंदीला सजवून गावोगावी मिरवतात. त्याचे खेळ दाखवत उपस्थितांचे मनोरंजन करतात. त्याच्याकडून भविष्यवाणी ऐकवात. स्वतःदेखील भविष्य सांगतात. मूळचे कडा आष्टी (जि. बीड) येथील किसन भिसे, महेंद्र भिसे, धनलाल यादव व कृष्णा गंगावणे हे आपल्या गोकूळ या नंदीबैलासह गेल्या चार-पाच दिवसांपासून येथे वास्तव्यास असून, शहर व परिसरात नंदीबैलाचे खेळ करून मनोरंजन करीत आहेत.
‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’, या बालगोपाळांच्या सार्वत्रिक प्रश्नावर होकारार्थी मान हलवित त्याने पावसाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अनेक ठिकाणी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. दरम्यान, नंदीबैलाच्या पायावर पाणी आणि कपाळावर हळदी - कुंकू व तांदूळ वाहून मुलाबाळांसह दर्शन घेतले. विविध ठिकाणी दर्शन घेणारांचे नंदीबैलामार्फत भविष्य सांगण्याचा प्रयत्न किसन भिसे व धनलाल यादव यांनी केला.
महाराष्ट्रात फार फार तर २५ नंदीबैल राहिले असतील. गुजरातमधील काँक्रेज या देशी वंशातूनच प्रशिक्षण देऊन नंदीबैल तयार केले जातात. या बैलांना शिकविणारे कमी होत चाललेत. त्यामुळे भविष्यात नंदीबैल केवळ चित्रांतून, मोबाईलमधून, यु ट्युबवर आणि काही अंशी सिनेमातून दिसतील. आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नंदीबैलांची जोपासना करीत आहे. सरकार तसेच सामाजाने नंदीबैल समाज जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
किसन भिसे,नंदीबैलवाले
पूर्वी नंदीबैलाला घेऊन फिरताना काही दक्षिणा देताना धनधान्य, कपडे आवर्जून दिले जायचे. वाड्या-वस्त्यांवर आग्रहाने जेऊखाऊ घातले जायचे. नंदीबैलाला पाऊस पडेल काय, पीकपाणी चांगले येईल का? रोगराई हटेल का? असे प्रश्न विचारले जायचे. आता ट्रेंड बदलला असून, अमुक परीक्षेत मी पास होईल का? मी निवडून येईल का? मला तिकीट मिळेल का, असे प्रश्न विचारले जातात.
- महेंद्र भिसे, नंदीबैलवाले
05763
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.