शिरूरला आघाडी एकसंध, महायुतीत बिघाडी
शिरूर, ता. १७ : शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी सोमवारी अभुतपूर्व घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी एकसंध झाल्याचे चित्र असतानाच महायुतीत मात्र बिघाडी झाल्याचे समोर आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली. १२ प्रभागांतील २४ जागांसाठी एकूण १२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नगर परिषद कार्यालयातच उमेदवारी अर्ज स्विकारण्याची व्यवस्था असल्याने नगर परिषद कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. महाविकास आघाडी एकसंध झाली असताना महायुतीमध्ये मात्र बेबनाव झाल्याने आणि युतीतील सर्वच घटक पक्षांनी स्वबळाचा नारा देत शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारांची संख्या अचानक वाढली. दिवसभरात ६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांसमवेत आमदार माऊली कटके, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाआघाडीच्या उमेदवारांसोबत माजी आमदार अशोक पवार, भाजपच्या उमेदवारांसोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे व तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्यासह पदाधिकारी होते.
नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा वैशाली दादाभाऊ वाखारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर माजी नगराध्यक्षा सुवर्णा राजेंद्र लोळगे (भाजप) माजी उपनगराध्यक्ष अलका सुरेश खांडरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), माजी नगरसेविका रोहिणी किरण बनकर (शिवसेना) यांच्यासह ऐश्वर्या अभिजित पाचर्णे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अनेकांना राजकीय पक्षांकडून अखेरच्या क्षणी उमेदवारी देण्यात आल्याने त्यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र होते. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी सर्वच प्रमुख पक्षांतून उमेदवारी अर्ज कापण्याचे किंवा इकडचा उमेदवार तिकडे ओढण्याचे प्रकार झाल्याने अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी इतर पक्षांच्या चिन्हावर उभे राहिल्याचे दिसून आले.

