‘संकल्प बोल के, हम तो निकल पडे...’
शिरूर, ता. २४ : गळ्यात रंगीबेरंगी किंवा आपापल्या पक्षांच्या चिन्हांचे गमचे घातलेले उमेदवार... कपाळाला गंध, हातात गंडे- दोरे घालून मतदारांच्या पायावर डोके ठेवतानाचे चित्र एका बाजूला असतानाच, याच प्रचारफेऱ्यांचे, देवदर्शनाचे, पूजाअर्चांचे शुटींग करून त्याला चपखल बसतील अशा समर्पक गीतांची जोड देत सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे बहुतेक सर्वांचे मोबाइल ‘विजयी भव’च्या गर्जनांनीच खणखणत आहेत.
बदलत्या चालीरीती आणि बदलत्या युगासह निवडणुकांचा ट्रेंडदेखील झपाट्याने बदलत चालला आहे. प्रगत युगाचे एक हक्काचे आणि प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलचा प्रचारासाठी पुरेपूर वापर केला जात आहे. रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार, त्यापूर्वी भिंतींवर रंगविले जाणारे फलक ते आता होत असलेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी शक्यतो प्रत्यक्ष भेटीगाठी, पदयात्रा आणि सोशल मिडियाचा प्रभावी वापर बहुतेक सर्वच उमेदवारांकडून प्रचारासाठी केला जात आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून कल्पकतेने व्हिडिओ तयार करून त्याला समर्पक गीतांची जोड देत ते विविध ग्रुपसह आपापल्या प्रभागातील मतदारांच्या मोबाइलवर पाठविले जात आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारचिन्हासह विविध गीतांच्या धून वाजत आहेत. त्यामुळे प्रचारासह वातावरणातही रंगत भरत आहे.
उमेदवारांचे हात जोडलेले, हात उंचावून अभिवादन करतानाचे फोटो टाकून त्यात फिक्स नगराध्यक्ष, परमनंट नगरसेवक, उभरते नेतृत्व, आता माघार नाही, लढायचं न जिंकायचं, जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा, आधाराशिवाय लढणाराचाच इतिहास लिहिला जातो, प्रगतीच्या मार्गावर आमचा सक्षम चेहरा, प्रत्येक पाऊल आणि कृती प्रभागाच्या विकासासाठी आदी दमदार, प्रभावी वाक्यांची साखरपेरणी करून उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व व नेतृत्व सोशल मिडियाद्वारे उजळविले जात आहे. याबाबत पुरुष उमेदवारांसह महिला उमेदवार देखील आघाडीवर आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागीर व कलाकारांनाही त्यामुळे सुगीचे दिवस आले असून, त्यांच्याही हाती चार पैसे अधिकचे येऊ लागले आहेत.
शहरात व्हिडिओ मिक्सिंग, विविध प्रकारची गीते अपलोड करणारे अनेक कलाकार असून, त्यांनी छोट्याशा जागेत थाटलेली त्यांची या व्यवसायाची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आहे. नगर परिषद निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आपापली कामे करून घेण्यासाठी या दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. विविध प्रकारच्या डिझाईन्स, फ्लेक्स, बॅनर आता प्रत्यक्ष छापून घेण्याऐवजी मोबाईलवरच कसे चांगले दिसेल, यासाठी वैविध्यपूर्ण पत्रके तयार करून घेतली जात आहेत.
या गीतांचा बोलबाला
‘संकल्प बोल के, हम तो निकल पडे... विजयी भव... आंधी है ये जलजला है... आदी हिंदी गीतांपासून ते ‘आता थांबायच नाय...’ ‘तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची...’ ‘तुफानातले दिवे आम्ही...’ ‘उठ रे, चल रे उड रे झेप घे...’ आदी मराठी गाण्यांचा कल्पक वापर करून तयार केलेले व्हिडिओ मोबाइलवर हमखास बघितले जात आहेत. अत्यंत प्रभावी पद्धतीने हे व्हिडिओ बनविणारे कलाकार रात्रंदिवस याच कामात गढून गेलेले दिसत असून, अशा कल्पक कलाकारांना या निवडणुकांमुळे चार पैसे गाठीला बांधायची संधी आल्याचे दिसत आहे.
नगर परिषद निवडणूका सुरू होताच अनेक इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक याबरोबरच विविध पक्षांची चिन्हांसह विविध प्रकारची पत्रके बनविताना वैविध्यपूर्ण वाक्यरचना आम्हाला करावी लागते. तथापि, ‘एआय’वर याबाबतचा वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर सहज उपलब्ध होत असल्याने फारसे कष्ट घ्यावे लागत नाही.
- अविनाश साबळे, अवी साबळे ग्राफिक्स्, शिरूर
विविध प्रकारची पत्रके, जाहिरनामे, उमेदवार परिचय पत्रके व आवाहन पत्रकांच्या ऑर्डर येत असल्या, तरी मजकूर जुळवून पत्रके छापून वाटण्याचे काम काहीसे जिकिरीचे आहे. त्यामुळे मोबाइलवर ही पत्रके उपलब्ध करून देण्याबाबत उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आग्रह धरला जात आहे. आम्ही ती सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
- सूरज पाचंगे, शक्ती प्रिंटर्स, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

