शिरूरमध्ये एका दिवसात तीन बिबटे जेरबंद
शिरूर, ता. ४ : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये घुसलेल्या आणि गेल्या दोन दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. फियाट कंपनीच्या चार नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (ता. ४) पहाटे पावणेसहाच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या अडकला. तालुक्याच्या ग्रामीण भागातील पिंपरखेड व कवठे येमाई येथील रावडेवाडी येथेही बिबटे जेरबंद झाले. एका दिवसांत तीन बिबटे जेरबंद झाले आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात बिबट्या जेरबंद होण्याची ही दुसरी वेळ आहे. तर पिंपरखेड येथे गेल्या दहा दिवसांत दहा तर कवठे परिसरात आठवडाभरात चार बिबटे जेरबंद झाले आहेत. तालुक्याच्या बेट भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून पाळीव प्राणी, कुत्र्यांसह मानवांवरील हल्ल्यातही वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आपल्या अस्तित्वाने भिती आणि डरकाळ्यांनी दहशत पसरविणाऱ्या या बिबट्याला पकडल्याने औद्योगिक पट्ट्यातील कामगारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दोन दिवसांपूर्वी कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा बिबट्या कंपनीच्या आवारात आला असावा, असा अंदाज कंपनी व्यवस्थापनाकडून व्यक्त केला होता. कंपनीच्या तीन एकरहून अधिक परिसरात वनराई फुलविली असून त्या परिसरात या बिबट्याचा मुक्त वावर होता. काल पहाटे गस्तीदरम्यान, सुरक्षारक्षकांच्या वाहनाला हा बिबट्या सामोरा आला होता. सुरक्षा रक्षकांनी या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फैलावल्याने कामगारांत घबराटीचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक सविता चव्हाण यांच्यासह रेस्क्यू टीम सदस्य शेरखान शेख, जयेश टेमकर, विकास चव्हाण, संदीप गव्हाणे, रोहिदास शेंडगे, राहुल अवचिते, सुधीर शितोळे, मनोज चौधरी, दिनेश गोरड यांच्यासह या परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी फियाटसह एलजी कंपनीच्या परिसरातही पिंजरे लावले होते.
05925
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

