सासवडच्या मुख्याधिकाऱ्यांना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडच्या मुख्याधिकाऱ्यांना धमकी
सासवडच्या मुख्याधिकाऱ्यांना धमकी

सासवडच्या मुख्याधिकाऱ्यांना धमकी

sakal_logo
By

सासवड, ता. ११ : येथील नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, चौक, विनापरवाना टपऱ्या, वाहतुकीस अडथळा आणणारे शेड, ओटे, पायऱ्या, गटारे, नाले यावरील अतिक्रमणे काढण्यास नगरपालिकेने मंगळवारपासून (ता. ११) सुरवात केली. मात्र, बुधवारी शहरातील अंबोडी मार्गावरील पुरंदर हायस्कूल समोरील एका लोकवस्तीलगत अतिक्रमण काढत असताना माजी नगरसेवक सचिन भोंडे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना धमकी दिली.
याबाबत मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले की, अतिक्रमण काढण्यासाठी किंवा काढण्यासंदर्भात नोटीस दिल्यापासून जवळपास ६० ते ७० टक्के लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली. सुजाण लोक याला प्रतिसाद देत आहेत. मात्र, आंबोडी रस्त्यावरील पुरंदर हायस्कूल समोरील भागात एक गृहनिर्माण सोसायटीच्या नावाखाली कमर्शिअल बांधकाम करणाऱ्यांना एक महिन्यापूर्वी नगरपालिकेने नोटीस दिली होती. तरी तेथील पूर्ण अतिक्रमण न निघाल्याने ते काढण्याचा प्रयत्न नगरपालिकेने आपल्या यंत्रणेद्वारे केला. त्यावेळी तेथील वस्तीतील काही लोकांनी अगोदर विरोध केला. परंतु विषय समजून सांगितल्यानंतर त्यांचा राग शांत झाला. मात्र, सचिन भोंडे यांनी, ‘मी या संबंधित गृहनिर्माण सोसायटीचा अध्यक्ष आहे. तुम्ही आज पोलिस बरोबर आहेत त्यामुळे दबाव आणून अतिक्रमणाच्या नावाखाली आमची बांधकामे तोडता, परंतु दोन दिवसानंतर तुमच्याबरोबर पोलिस नसतील, त्यावेळेस तुम्ही गावातही फिरू शकणार नाही किंवा फिरून देणार नाही,’ अशा प्रकारची थेट धमकी दिली आणि कामात अडथळा आणला. याबाबत सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, येत्या २४ तासात भोंडे याने पोलिसांकडे आणि नगरपालिकेकडे माफीनामा लिहून न दिल्यास सरकारी कामात अडथळा आणला आणि जिवे मारण्याची धमकी दिली, या पद्धतीचा विस्तारित गुन्हा नोंदवला जाईल.