
सूर्यनमस्कार परिपूर्ण व्यायामप्रकार : भारमळ
सासवड, ता.१२ : मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा काळ सूर्योपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या थंडीच्या
काळात केलेल्या शारीरिक व्यायामामुळे आरोग्यलाभ होतो. सूर्यनमस्कार हा सर्वांगपरिपूर्ण व्यायामप्रकार असून त्यामध्ये योगासने आणि प्राणायाम या दोन्हींचे मिश्रण आहे. त्यामुळे वर्षभर याला महत्त्व दिले पाहिजे, असे मत वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी व्यक्त केले.
सासवड (ता.पुरंदर) शहरामधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालयामध्ये ''सकाळ''च्या सूर्यनमस्कार उपक्रमाअंतर्गत सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. सूर्यनमस्कार आणि त्यांचे महत्त्व तसेच सूर्यनमस्कार घालताना म्हणावयाचे मंत्र यासंदर्भात विद्यालयाचे संस्कृत शिक्षक अभिजित तोडकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर १३ सूर्यनमस्कार घालण्याचा सराव केला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊराव खुने आणि सर्व शिक्षकवृंद मैदानावर उपस्थित होता.
03270