
तृणधान्याचा आहारामध्ये वापर गरजेचा
सासवड, ता.२५ : ''''पौष्टिक धान्ये सध्या आहारातून कमी झाली आहेत. एवढीच नव्हे तर ती शेतातूनही गायब झाली आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पारंपरिक पौष्टिक तृणधान्याचा दररोजच्या आहारामध्ये वापर वाढणे गरजेचे आहे. यामुळे पौष्टिक मूल्यांमध्ये वाढ होते. यासाठी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाअंतर्गत पौष्टिक तृणधान्य उपक्रम हाती घेतला आहे,'''' असे पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी स्पष्ट केले.
सासवड (ता.पुरंदर) येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सासवड मंडळ कृषी अधिकारी यंत्रणेने तृणधान्य पाककृती स्पर्धेचे तसेच प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना, महिलांसाठी आरोग्य प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच केले होते. बोरकर फार्म येथे स्पर्धा पार पडली. या पाककृती स्पर्धेमध्ये ३० महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच प्रशिक्षणासाठी सत्तर महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जाधव यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आयोजित करण्याचे महत्त्व विशद केले.
प्रथम तीन स्पर्धकांना देशमुख हायटेक, मगर कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी परिसरातील जमलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी जाधव बोलत होते. यावेळी आयुर्वेदिक डॉ. घनश्याम खांडेकर, डॉ. संतोष जगताप, वैभव कुडले, सासवडचे मंडळ कृषी अधिकारी शेखर कांबळे, कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप, रवींद्र खेसे, कृषी सहायक दीपाली गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
03313