साहित्य श्रेष्ठ तर राजकारण दुय्यम
सासवड, ता. १३ : आचार्य अत्रे राजकारणात नसते तर आपल्याला आणखी साहित्य मिळाले असते आणि त्यांचे साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य श्रेष्ठ आहे आणि राजकारण दुय्यम आहे. आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वात साहित्यिक आणि राजकारणी यांचा संगम होता, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सासवड (ता.पुरंदर) येथील क-हेकाठावर बुधवारी (ता. १३ ऑगस्ट) सासवडचे सुपुत्र आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८ व्या एक दिवसीय आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि ''सकाळ'' चे मुख्य उपसंपादक सु. ल. खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने आणि महाराष्ट्र गीताने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी प्रतिष्ठानमधील आचार्य अत्रेंच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे सासवड शाखा अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, संमेलन स्वागताध्यक्ष डॉ. विनायक खाडे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी हेमंतकुमार माहूरकर, दत्ता चव्हाण, सुदाम इंगळे, दत्तात्रेय शेंडकर, नंदकुमार जगताप, श्यामकांत भिंताडे, वामन कामठे, अॅड. अण्णा खाडे, अॅड चंदन मेमाणे, श्याम महाजन, डॉ. गिरिजा शिंदे, कुंडलिक मेमाणे, सुभाष तळेकर, संदीप टिळेकर, नारायण टाक, रवींद्रनाथ ताकवले, शेवंता चव्हाण, शांताराम पोमण, गौरव कोलते यांसह पुरंदरमधील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळचे मुख्य उपसंपादक, सु. ल. खुटवड यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अत्रेंमधील वक्ते, राजकारणी, विनोदी लेखक, नाटककार, पत्रकार, शिक्षक, चित्रपट निर्माते, कवी, विडंबनकार आणि शिक्षणतज्ज्ञ यांसारखे विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. स्वागत बंडूकाका जगताप यांनी, सूत्रसंचालन सचिन घोलप यांनी तर अॅड. कला फडतरे यांनी आभार मानले.
...तर गुंजवणीचा प्रकल्प मार्गी लागेल
गुंजवणी प्रकल्प निधी, पुनर्वसन आणि वनविभागामध्ये अडकला आहे. हा परिसर आता पुण्याचे उपनगर होत असल्याने ही योजना मार्गी लागेल. शासनाने अशा प्रकल्पांसाठी १०-२० टक्के निधी राखीव ठेवल्यास असे प्रश्न निर्माण होणार नाहीत, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आचार्य अत्रेंनी आयुष्यभर लोकांना हसवले. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी ते यशस्वी झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि साहित्यातील त्यांचे योगदान याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अत्रेंच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी शासनाने पुणे किंवा सासवड येथे भव्य स्मारक उभारावे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आचार्य अत्रेंनी काय भूमिका घेतली असती, अत्रे ही व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मिडास राजाप्रमाणे प्रत्येक अत्रेंचे प्रत्येक क्षेत्राचे सोने केले. अत्रेंचे विचार आणि कार्य हे आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहे.
- सु. ल. खुटवड, अध्यक्ष, आचार्य अत्रे साहित्य संमेलन