सासवडमधील रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी
सासवड, ता. ९ : सासवड (ता. पुरंदर) शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदर तालुका अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, सासवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राऊत यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे, शहरातील अनेक रुग्णालयांनी आवश्यक असलेले ना- हरकत दाखले घेतलेले नाहीत. तसेच, त्यांच्याकडे रुग्णांच्या वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था आणि रुग्णवाहिकेसाठी पुरेशी जागा नाही. याशिवाय, दवाखान्यांमध्ये पुरेशी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही आणि काही रुग्णालयांमध्ये लिफ्टची सोयही नाही. अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बीएचएमएस आणि बीएएमएस पदवीधारक डॉक्टर काम करत असून, त्यांनी आवश्यक असलेली पीजीडीईएमएस पदवी घेतली आहे की नाही, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात यावी. तसेच, अनेक रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांऐवजी दहावी- बारावी उत्तीर्ण महिला काम करत आहेत. रुग्णालयांमधून निघणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते की नाही, याचीही तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.