सासवडमधील मतदारांचा कपाळावर हात!

सासवडमधील मतदारांचा कपाळावर हात!

Published on

सासवड, ता. १४ : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकराज असल्यामुळे वाया गेलेल्या एका पंचवार्षिक निवडणुकीची कसर भरून काढण्यासाठी की काय, सासवड नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांचा महापूर आला आहे. या निवडणुकीसाठी चक्क ‘दोन’ पंचवार्षिक निवडणुकांएवढे इच्छुक रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्याने सासवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, इच्छुकांचे विविध आणि काहीसे ‘आश्चर्यकारक’ स्वभाव पाहता, मतदार आता कपाळाला हात मारून घेत आहेत.
​​नगराध्यक्षपद जनतेतून आणि सर्वसाधारण असल्याने या पदासाठीही इच्छुकांची संख्या वाढली आहे. प्रभागात अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने काही मंडळी थेट अध्यक्षपदासाठी इच्छुक होत आहेत. तर नगरसेवकपदासाठी काही इच्छुकांनी तर आरक्षण वेगळे असतानाही गुडघ्याला बाशिंग बांधले असून, अशा मंडळींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ​माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. तर, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती किंवा आघाडी होईल का, तशा काही हालचाली सुरू आहेत का, याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, यावर पुढील समीकरणे अवलंबून आहेत. ​काही दिवसांपूर्वी याच समस्यांसाठी दररोज निवेदने देणारे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आता मात्र मतदार याद्या तपासण्यात व्यस्त झाले आहेत.

भाजपकडून इच्छुक सर्वाधिक
मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत सासवड नगरपरिषदेवर माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. विशेष म्हणजे सासवडमध्ये यापूर्वी कधीही भाजपचा सदस्य नव्हता. मात्र, आता संजय जगताप यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणि राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने, भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. आता उमेदवारी मिळाली नाही तरी स्विकृतसाठी पदासाठी आपला विचार होईल या विश्वासानेही अनेकजण इच्छुक आहेत.

‘ते'' इच्छुक आणि मतदारांचा गोंधळ :
आपल्या आलिशान चारचाकीची काच कधी खाली न घेणारे, शेजारच्यांशी कधी न बोलणारे, घरासमोरील रस्त्यावर दुसऱ्याची दुचाकीही उभी राहू न देणारे, कॉलेज जीवन संपल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी वर्गमित्रांना आठवणारे, तर कधीही जनसामान्यांमध्ये न वावरणारे... अशा वेगवेगळ्या आणि विसंगत स्वभावाच्या व्यक्तींनी समाज माध्यमातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने नागरिक संभ्रमात आहेत. अशा उमेदवारांना मत द्यायचे का, आणि कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर किंवा कारण या इच्छुकांकडून मतदारांना मिळेल का, अशी विचारणा सध्या शहरात होत आहे.

महत्त्वाच्या खात्यांकडे दुर्लक्ष, समस्या कायम
निवडणुकीचे वारे वाहत असतानाच सासवड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा, आरोग्य आणि बांधकाम या तीन महत्त्वाच्या खात्यांच्या प्रमुखांच्या बदल्या झाल्याने या जागा रिक्त आहेत. मात्र, या महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींकडे कोणाचेही लक्ष नाही. रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, घंटागाडी अशा मूलभूत सुविधांबाबत नागरिक समाधानी नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com