सासवड सांस्कृतिक मंडळाच्या किल्ले स्पर्धांना प्रतिसाद
सासवड, ता. २४ : सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पुरंदर-हवेलीमध्ये १९ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या किल्ले स्पर्धांना यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास, स्वराज्याचे कार्य आणि किल्ल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने सुरू केलेला उपक्रम आता सफल होत असल्याचे मत सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या प्रयत्नाने स्वराज्यातील १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने किल्ल्यांचे जतन, संवर्धन होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील श्री काळभैरवनाथ मंदिरासमोरील श्री काळभैरवनाथ दुर्ग सेवक आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सासवड यांनी तयार केलेल्या विशाळगड किल्ल्याच्या पाहणीने सासवड सांस्कृतिक मंडळाच्या किल्ले स्पर्धांच्या परीक्षणाची सुरुवात झाली. यंदा स्पर्धेला पुरंदर-हवेलीमधून पाच हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, संग्राम जगताप, कैलास कावडे, रामभाऊ इनामके, संजय चव्हाण, प्रकाश जगताप, वैभव जगताप, तेजस शिवरकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप, सदस्य संजय काटकर, प्रवीण पवार, अमित पवार, सागर घाटगे, दीपक जगताप, जीवन कड आदी किल्ल्यांचे परीक्षण करत आहेत.
संजय जगताप यांनी श्री काळभैरवनाथ दुर्गसेवक मंडळाच्या स्पर्धेतील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण सहभागाबद्दल विशेष कौतुक केले. ‘‘संग्राम पाटोळे, सौरभ पाटोळे व इतर सदस्य किल्ला उभारणी करताना त्या किल्ल्याला स्वतः भेट देऊन, तेथील इतिहास, रचना, दुर्ग बांधणीचे बारकावे समजून घेत त्याची प्रतिकृती उभी करतात. तसेच, वार्षिक अहवाल तयार करणारे हे दुर्ग मंडळ देशात पहिले असावे, अशा मंडळांमुळे या चळवळीला प्रेरणा मिळत असून, स्पर्धेला अधिक चांगले स्वरूप येईल,’’ असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

